प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनीचे २० वे वार्षिक अधिवेशन पावसमध्ये होणार
रत्नागिरी : प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज प्रबोधिनी आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पावस येथील श्रीस्वामी स्वरुपानंद समाधी मंदिरात १९ व २० ऑक्टोबरला विसाव्या अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीपादजी नाईक यांच्या हस्ते होणार आहे.या अधिवेशनामध्ये प. प. श्री. वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराजांच्या साहित्यावर १९ आणि २० ऑक्टोबर २०२४ या दोन्ही दिवशी सकाळी ९ ते ६ या वेळेत राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मशताब्दी वर्षापूर्वी स्वामीजींच्या श्री क्षेत्र गरुडेश्वर येथील समाधी स्थानी १९ आणि २० ऑक्टोबर २००२ रोजी श्री. नारायणकाका ढेकणे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज प्रबोधिनीची स्थापना झाली. स्वामीजींच्या संपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन , विविध भाषांमध्ये भाषांतर, स्वामीजींच्या संपूर्ण जीवन कार्याचा प्रसार ही प्रबोधिनीची मुख्य उद्दिष्टे आहेत.परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज (१८५४-१९१४), यांचा जन्म १८५४ साली महाराष्ट्रातील सावंतवाडीजवळील माणगाव गावी एका सत्प्रवृत्त कुटुंबात श्री. गणेश टेंबे आणि सौ. रमाबाई यांच्या पोटी झाला. त्यांचे पाळण्यातील नाव ‘वासुदेव’ ठेवले. श्री द्विसहस्त्री गुरू चरित्र, श्री दत्त पुराण, श्री दत्तलीलामृताब्धीसार, योगरहस्य आणि बोधरहस्यावर द्विसहस्त्री टीका – चुर्णिका, श्री दत्त पुराणावर टीका, माघ माहात्म्य , श्री दत्त माहात्म्य, श्री दत्त काव्य त्रिशती, श्री गुरु संहिता (समश्लोकी), लघु वासुदेव मानससार, सप्तशती गुरु चरित्रसार, श्री कृष्णालहिरी, श्री दत्तचंपू, कुमारशिक्षा, समश्लोकी चूर्णिका, श्री कृष्णालहिरींवरील टीका, युवाशिक्षा आणि वृद्धशिक्षा, स्त्रीशिक्षा यासारखी फार मोठी ग्रंथ संपदा संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेत श्रीमद्वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्यासाठी निर्माण करुन ठेवली आहे. या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा मा. शिल्पाताई पटवर्धन आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये यांच्याशी संपर्क साधावा.