
शिवसेना संपवायला निघालेल्या आणि तिकडे बसून सत्तेची पदे भोगणाऱ्यांना परत घेणार नाही-उद्धव ठाकरे.
आपल्या पक्षाला सोडून गेलेल्यांना पक्षात पुन्हा घेणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. उद्धव यांनी यासाठीचे निकषच सांगितले आहेत.कल्याण-डोंबिवलीतील शिंदेसेनेचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह रविवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना उद्धव यांनी पक्षात पुन्हा घेण्याबाबत भाष्य केले. उद्धव यांनी म्हटले की, आपले चांगले चाललेले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लोभापायी पाडले. शिवसेना संपवायला निघालेल्या आणि तिकडे बसून सत्तेची पदे भोगणाऱ्यांना परत घेणार नाही आणि उमेदवारीही देणार नसल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले.उद्धव यांनी म्हटले की, अनेकजण धाकधपटशामुळे, दिशाभूल झाल्याने तिकडे (शिंदे गटात) गेले. मोहजालामुळे तिकडे खेचले गेलेल्या अनेकांचे डोळे आता उघडत आहेत. त्या सर्वांना परत पक्षात घेणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.कल्याण-डोंबिवलीतील शिंदेसेनेचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव यांनी सांगितले की, तुमच्या डोळ्यावर झापड बांधली गेली होती. आता सगळ्यांचे डोळे उघडले हे चांगले झाले. तुम्ही त्यांच्या आहारी गेला होता ते हिंदुत्व, ते विचार बाळासाहेबांचे नाहीत हे तुमच्याही लक्षात आले. सध्या अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत असल्याचा बोचरा वारही उद्धव यांनी केला.