पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवासाचे मुंबईकरांचे स्वप्न अखेर पूर्ण! दर साडेसहा मिनिटांनी…!! मुंबई : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे मुंबईकरांचे स्वप्न दोनच दिवसांत पूर्ण होणार आहे. ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा येत्या शनिवारी ५ ऑक्टोबर रोजी सर्वांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उदघाटन होणार आहे. लोकार्पण झाल्यानंतर त्वरित आरे – बीकेसी टप्पा मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे.

मेट्रो ३चा पहिला टप्पा ऑक्टोबरमध्ये पहिल्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होईल, असे नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (‘एमएमआरसी’) जाहीर करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई आणि ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी ठाण्यात विविध विकास कार्यक्रमांचे उदघाटन, भूमिपूजन करणार आहेत. तर वांद्रे – कुर्ला संकुल येथे मेट्रो स्थानकावर ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे उदघाटन करून भुयारी मेट्रोने प्रवास करणार आहेत. तसेच यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (‘एमएमआरसी’) पॉड टॅक्सी प्रकल्पाचे भूमिपूजनही होण्याची शक्यता आहे.’एमएमआरसी’च्या ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या टप्प्यास सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.*आरे ते बीकेसी पहिला टप्पा*’कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३ मार्गिका’ संपूर्णतः भुयारी असून या मार्गिकेची लांबी ३३.५ किमी आहे. तर या मार्गिकेचा खर्च ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक आहे. ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा १२.५ किमी लांबीचा असून या टप्प्यात दहा मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या टप्प्याच्या लोकार्पणानंतर मुंबईकरांना आरे – बीकेसी अंतर केवळ २२ मिनिटांत पार करता येणार आहे. आरे – बीकेसी दरम्यानच्या प्रवासासाठी १० ते ५० रुपये असे तिकीट दर निश्चित करण्यात आले आहेत. या टप्प्यासाठी सध्या ‘एमएमआरसीएल’कडे १३ मेट्रो गाड्या सज्ज आहेत. मात्र १३ पैकी आरे – बीकेसीदरम्यान केवळ ९ मेट्रो गाड्या धावणार आहेत. दिवसाला भुयारी मेट्रो मार्गिकेवर मेट्रोच्या ९६ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक साडेसहा मिनिटांनी एक मेट्रो गाडी सुटणार आहे. वाहनचालक मुक्त अशा या अत्याधुनिक मेट्रो गाड्या असल्या तरी मेट्रो गाड्यांमध्ये मेट्रो पायलट अर्थात मेट्रो चालक उपस्थित असणार आहेत. सध्या पहिल्या टप्प्यासाठी ४८ मेट्रो पायलटची नियुक्ती करण्यात आली आहे. यात १० महिला मेट्रो पायलटचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button