
निपुण महाराष्ट्र मूल्यमापनात जिल्हा राज्यात आघाडीवर!
महाराष्ट्र राज्य शासनाच्या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी पहिल्यांदा बदलत्या काळानुसार आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. या कामाचा सुमारे ७६ टक्के भाग पूर्ण झाला आहे. राज्यात मूल्यमापनाचे काम रत्नागिरी जिल्ह्याने सर्वाधिक पूर्ण केले असल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
इयत्ता दुसरी ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन कौशल्य यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने मूल्यमापन केले जात आहे. आतापर्यंत शेकडो शाळांची तपासणी पूर्ण झाल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकृत विभागाने सांगितले. पूर्वी खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासली जात असे. मात्र आता प्रत्येक विद्यार्थ्यांच मूल्यांकन अचूक आणि निष्पक्ष व्हावे, यासाठी या कार्यक्रमात एआय आधारित ऍपचा वापर केला जात आहे. या ऍपच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांची प्रगती वैयक्तिक पातळीवर तपासली जाते.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली असून मागील १० ते १२ दिवसांत शाळांमधील विद्यार्थ्यांचे लेखन वाचन कौशल्य तपासण्यात आले आहे. उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांना एआय प्रणाली शाबासकीची थाप देत कौतुक करते, तर अप्रगत विद्यार्थ्यांना लेखन वाचन पुन्हा सराव करण्याचा संदेश पाठवते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यकतेनुसार कमी जास्त मार्गदर्शनही मिळते. प्राथमिक शिक्षण विभागात केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी-उपशिक्षणाधिकारी असा पर्यवेक्षणीय कर्मचारी वर्ग कमी प्रमाणात आहेत. केवळ निम्मी पदे भरली गेली आहेत, असे असताना शिक्षणाधिकारी प्राथमिक किरण लोहार यांनी पाठपुरावा करुन निपुण महाराष्ट्राची चाचणी घेण्यामध्ये रत्नागिरी जिल्हा अग्रेसर रहावा म्हणून प्रयत्न केले. त्याला चांगले यश प्राप्त झाले.www.konkantoday.com




