श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्यातर्फे ज्येष्ठांना नवसंजीवनी देणारे उपक्रम लाभदायक. स्नेह मेळाव्यात कट्टा संयोजक अण्णा लिमये यांचे प्रतिपादन.
रत्नागिरी प्रतिनिधी* : येथील श्रीराम मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक कट्ट्यातर्फे मासिक स्नेह मेळावे, ज्येष्ठांचे वाढदिवस, भजनी कलावंत मेळावे, विनोदी कलाकारांचे हास्यविनोद, प्राणायाम आणि योग शिबिर, धार्मिक पर्यटन सहली, असे विविध उपक्रमांचे होणारे आयोजन हे वयोवृद्ध ज्येष्ठांना नवसंजीवनी देणारे असून निरोगी जीवनशैली कायम टिकविण्यासाठी लाभदायक ठरत आहेत, असे प्रतिपादन कट्ट्याचे मुख्य संयोजक अण्णा लिमये यांनी केले. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या दिनांक 21 सप्टेंबर रोजी आयोजित स्नेह मेळाव्यात प्रसिद्ध विनोदवीर संदीप पावसकर यांनी खास कोकणी शैलीत आपल्या विनोदांच्या सादरीकरणातून ज्येष्ठ नागरिकांचे निखळ मनोरंजन केले. कविता, संवाद याद्वारे ज्येष्ठांना आवडीच्या छंदात मन रमवून उर्वरित आयुष्य उमेदीने जगण्याविषयी प्रबोधन केले. कट्ट्याचे सचिव समाज भूषण सुरेंद्र घुडे यांनी कलाकार संदीप पावसकर यांच्या विविधरंगी विनोदी उपक्रमांचा यावेळी परिचय करून दिला. त्यानंतर संयोजक अण्णा लिमये यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचेही श्री श्रीरामाच्या मूर्ती पुढे नतमस्तक होत सत्कार करण्यात आले. यावेळी माजी प्राचार्य प्रतापराव सावंत देसाई, नित्यानंद दळवी तसेच कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र शंकरराव कदम यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढील स्नेह मेळावा शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी आयोजित केल्याचे यावेळीजाहीर करण्यात आले.