
तर रिफायनरीला विरोध करणारे खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जनता कदापि माफ करणार नाही -माजी आमदार प्रमोद जठार
शिवसेनेच्या सततच्या विराेधामुळे नाणार येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही.आता हा प्रकल्प बारसू-सोलगाव येथे होण्यासाठी कंपनीकडून चाचपणी केली जात आहे. मात्र तेथेही शिवसेनेच्या विरोधामुळे प्रकल्प न झाल्यास जनता खासदारांना माफ करणार नाही आणि पुन्हा निवडूनही आणणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला. नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित झाला होता. येथे प्रकल्प होण्यासाठी स्थानिक जमीन मालक आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे संमतीपत्रे दिली होती. मात्र खासदार विनायक राऊत यांच्यासह तेथील शिवसेना नेत्यांनी या प्रकल्पाला विरोध कायम ठेवला.आता उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असल्याने नाणार येथील रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्यात जमा आहे. त्यामुळे कंपनीने राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या ठिकाणच्या प्रकल्प होण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्याअनुषंगाने सोलगाव, बारसू याठिकाणी २३०० एकरसाठी अधिसूचना काढण्यात आली आहे.सध्या त्या परिसरात ११ हजार ५०० एकर जमिनीची उपलब्धता आहे. या क्षेत्रात एकही गाव अथवा वाडी विस्थापित होत नाही. त्यामुळे येथे प्रकल्पाबाबत अजून विरोधाची भूमिका नाही. मात्र येथील बहुतांश ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे या भागातही रिफायनरीला विरोध झाला तर महाराष्ट्रातून रिफायनरी प्रकल्प बाहेर जाणार आहे. तसे झाल्यास रोजगाराच्या लाखो संधी वाया जाणार आहेत. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेसही फटका बसणार आहे.
www.konkantoday.com