
कुवारबाव येथे १ ऑक्टोबर रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा विशेष कार्यक्रम मनोविकार तज्ञ डॉ. शाश्वत शेरे स्मृतिभ्रंश या विषयावर मार्गदर्शन करणार रत्नागिरी प्रतिनिधी
*: कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर महातील जागतिक स्मृतिभ्रंश दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथील ख्यातनाम मनोविकार तज्ञ डॉक्टर शाश्वत शेरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून ज्येष्ठांचे मानसिक आरोग्य आणि सर्वव्यापी स्मृतिभ्रंश आजार या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत. या स्नेह मेळाव्यात सप्टेंबर महात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात येतील. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉमचे मुखपत्र असलेल्या मनोहारी मनोयुवा या मासिकामध्ये शासनाचे ज्येष्ठ नागरिक धोरण, ज्येष्ठांसाठी आयुष्यमान योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रसिद्ध होत असते. सप्टेंबरच्या अंकात राज्य शासनाने दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णयाद्वारे स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महामंडळाची माहितीही देण्यात आली आहे. ज्येष्ठांचा हक्काचा मार्गदर्शक असलेल्या या लोकप्रिय मासिकाचे सभासदांनी स्वयंस्फूर्तीने वर्गणीदार व्हावे, तसेच एक ऑक्टोबरच्या विशेष स्नेह मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहुन सहकार्य करावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी केले आहे.