सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित झाल्यावर राज्यातील विजेचे दर कमी होण्याची शक्यता.
राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना कार्यान्वित झाल्यावर कृषी पंपावरील दीड ते दोन रुपयांच्या क्रॉस सबसिडीचा भार कमी होईल. त्यामुळे राज्यातील व्यावसायिक, औद्योगिक व जास्त वीज वापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीज दर युनिटमागे सुमारे दीड ते दोन रुपयांनी कमी होतील, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.लोकेश चंद्र म्हणाले, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या ९ हजार २०० मेगावॉट प्रकल्पावर काम सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथील पहिला प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. येत्या महिन्याभरात राज्यात ५० मेगावॉट, डिसेंबरपर्यंत ५०० मेगावॉट, मार्च २०२५ पर्यंत ३ हजार मेगावॉट तर सप्टेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण ९ हजार २०० मेगावॉटचा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.