निसर्ग रक्षक, मानद वन्यजीव रक्षक, निलेश बापट यांचे दुःखद निधन.
चिपळूण :ग्लोबल चिपळूण टुरिझमचे संचालक, निसर्ग रक्षक, मानद वन्यजीव रक्षक (वन विभाग) निलेश विलास बापट यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दु:खद निधन झाले. निधन समयी ते ४६ वर्षांचे होते. रविवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. निसर्गाशी एकरूप झालेले व्यक्तिमत्त्व अशीच कै. निलेश बापट यांची ओळख होती. शहरातील चिंचनाका परिसरात त्यांचा गणपती कारखाना आहे. फटाक्यांचे होलसेल व्यापारी म्हणूनही ते शहरात प्रसिध्द होते. निसर्गावर प्रेम करणारा, निसर्ग संवर्धनासाठी झटणाऱ्या निलेश बापट यांच्या कार्याची दखल घेत वन विभागाने त्यांची मानद वन्यजीव रक्षक म्हणून नियुक्ती केली. ते धाडसी व उत्तम ट्रेकर्स होते. नवोदित ट्रेकर्सना ते कायम प्रोत्साहन देत असत.