एमआयडीसी हटवा आणि कोकण वाचवा-वाटद येथील शितप बंधूंचा देखावा.
एका बाजूला निसर्गसंपन्न वाटद गाव आणि दुसऱ्या बाजूला एमआयडीसी प्रकल्प आल्यानंतर होणारी दूरवस्था असा देखावा वाटद येथील शितप बंधूंनी साकारलेला आहे.यामधून औद्योगिक वसाहतीमुळे गावांचे गावपण राहत नाही, असा संदेश दिला आहे. हा देखावा पाहण्यासाठी स्थानिकांसह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थदेखील हजेरी लावत आहेत.राज्य शासनाकडून वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे. वाटदसहित कोळीसरे, कळझोंडी, गडनरळ, वैद्यलावगण, मिरवणे या भागात ही एमआयडीसी उभारली जाणार आहे. या एमआयडीसीला येथील स्थानिक ग्रामस्थ आणि चाकरमानी यांच्याकडून विरोध होत आहे. त्याची झलक शितप बंधूंनी साकारलेल्या घरगुती गणेशोत्सवातील देखाव्यातून दाखवली आहे.हा देखावा साकारताना एका बाजूला निसर्गसंपन्न वाटद गाव दाखवलेले आहे. त्यामध्ये हिरवळीने नटलेली झाडे, गावातील पारंपरिक सौंदर्य, पिढ्यानपिढ्या सुरू असलेले उद्योग नैसर्गिक पाण्याचे स्रोत, भाजीशेती इतर व्यवसाय जैवविविधतेने नटलेले पूर्ण दाखवण्यात आलेआहेत तर दुसऱ्या बाजूला एमआयडीसीतील प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर होणारा बदल दाखवण्यात आला आहे. प्रकल्प उभा राहिल्यानंतर होणाऱ्या प्रदुषणामुळे येथील निसर्गाची होणारी हानी कधीच भरून काढता येणार नाही. एमआयडीसी हटवा आणि कोकण वाचवा, असा संदेश या देखाव्यातून दिला आहे.