‘वेगळं घडतयं, मनातल्या शंका पक्क्या झाल्या…’, संजय राऊतांचे मोठे विधान, PM मोदी- सरन्यायाधीशांच्या भेटीवरुन टीकास्त्र!!
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरण, राहुल नार्वेकरांनी दिलेला आमदार अपात्रतेचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याप्रकरणांची सुनावणी होत नसून यावरुनच विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच बुधवारी (ता. ११ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी जात गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांमध्ये झालेल्या या भेटीनंतर विरोधक आक्रमक झाले असून महाराष्ट्राचे सरकार वाचवण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात का? असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.”प्रधानमंत्री गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले त्याची माझ्याकडे माहिती नाही. पण काल सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले. त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र पाहायला मिळाले. सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री हे संविधानाला आणि प्रोटोकॉलला धरून आहे का? याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रधानमंत्र्यांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश, महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही? तारखांवर तारखा का पडत आहेत याबाबत आमच्या मनात आता शंका आहे,” असे संजय राऊत म्हणाले.”सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यांसारखी व्यक्ती असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जाते. घटनाबाह्य पद्धतीने सरकार पाडले जाते, हे सरकार घटनाबाह्य आहे असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले. काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले त्यामुळे यामागे वेगळं काही घडतंय का? सरकार वाचवण्यासाठी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे खतम करायचे आणि त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? या लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या,” असा घणाघात राऊत यांनी केला.