एसटी चालकाला डुलकी लागल्याने एसटी बस उलटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्गातील आठ प्रवासी किरकाेळ जखमी.
चालकाला डुलकी लागल्याने एसटी बस उलटून झालेल्या अपघातात सिंधुदुर्गातील आठ प्रवासी किरकाेळ जखमी झाले. हे सर्व जण अंधेरी येथून गणेशोत्सवासाठी गावी येत होते. हा अपघात शनिवारी दुपारी संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली टप्पा येथे झाला.अपघातप्रकरणी चालक राजेंद्र उखा वाघ यांच्यावर संगमेश्वर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातप्रकरणी कैलास अशाेक साबळे यांनी फिर्याद दिली आहे. या अपघातात सुधीर सदाशिव मसूरकर (४०), प्रमिला सुधीर मसूरकर (३२), वीर सुधीर मसूरकर (१०), कार्वी सुधीर मसुरकर (५), प्रिया प्रकाश राणे (५१), वैभव प्रकाश राणे (३०), प्रवीण शंकर सावंत (४९) आणि विद्या प्रवीण सावंत (४९, सर्व रा.कणकवली, सिंधुदुर्ग) हे जखमी झाले आहेत.हे सर्वजण गणपतीसाठी गावाला येत हाेते. बसचालक राजेंद्र वाघ हे शनिवारी इगतपुरी येथून अंधेरी ते सावंतवाडी (एमएच १४, बीटी १७०८) ही गाडी घेऊन सिंधुदुर्गकडे जात हाेते. मुंबई-गाेवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील गाेळवली टप्पा येथे बस आली असता, चालक वाघ यांना डुलकी आली. त्यामुळे गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली.