
विसर्जनसाठी समुद्राच्या पाण्यात जाणं मुंबईकरांना महागात पडू शकतं.
आज म्हणजेच 8 सप्टेंबर 2024 रोजी दीड दिवसांच्या बाप्पांना गणेश भक्त निरोप देतील. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक किनारपट्ट्यांवर मोठ्या प्रमाणात घरगुती गणरायांचं विसर्जन केलं जातं.मात्र विसर्जनसाठी समुद्राच्या पाण्यात जाणं मुंबईकरांना महागात पडू शकतं. विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मत्स्यदंश करु शकणारे अपायकारक मासे मत्स्य विभागाच्या ट्रायल नेटिंगमध्ये आढळून आले आहेत. विशेष म्हणजे या अशा घातक माशांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यासंदर्भातील मुंबई शहर जिल्ह्याचे मत्यस्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी अधिक सतर्क रहावे आणि काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. दादर आणि गिरगाव येथील चौपाट्यांवर महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने चाचपणी केली. यामध्ये जेली फीश, ढोमी, कोळंबी, ब्लू जेली फिश, स्टिंग रे, शिंगटी, घोडा मासा, छोगे रावस असे मासे आढळून आले आहे. यापैकी काही माशांचा दंश गणेशभक्तांसाठी घातक ठरु शकतो. त्यामुळेच चौपाटीवर विसर्जनासाठी जाणाऱ्यांनी काही विशेष काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. गणेशमूर्तीचं विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेमार्फत नेमणूक केलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेच्या माध्यमातूनच करावे, असं सांगण्यात आलं आहे. गणपती विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात जाऊ नये, असंही सांगण्यात आलं आहे. सामान्यपणे विसर्जनच्या वेळी मासे पायांना दंश करतात. त्यामुळेच पायांना माशांनी दंश करु नये म्हणून गमबूट वापरावेत, असं प्रशासनाने सांगितलं आहे.