“मिरवणुकीत गणवेशात नाचू नका, नाहीतर.”, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश जारी; कारवाईचा इशारा!
मुंबई-पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रात आज लाडक्या बाप्पांचं आगमन होत आहे. बाजारपेठांमधून मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. घरगुती बापांसह शेकडो मंडळांमध्येही गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्व गणेशभक्तांच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन पोलीस वर्ग रस्त्यावर खडा पाहारा देत आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता मुंबईत पोलीस आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. यानुसार, त्यांना पोलीस गणवेशात गणेश मिरवणुकीत किंवा इतर ठिकाणी नृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ६ सप्टेंबर रोजी सुरक्षाव्यवस्था व पोलीस दलाची उपलब्धता याचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी मुंबईत पोलिसांनी गणेशोत्सवादरम्यान गणवेशावर नाचू नये, अशी सक्त ताकीद पोलीस आयुक्तांनी दिली आहे. यासंदर्भात एएनआयनं एक्सवर माहिती दिली आहे.