जखमी गोविंदांवर विम्याविना उपचार! वैद्यकीय खर्चासाठी नातेवाईकांची पदरमोड!!

मुंबई : उंच दहीहंडी फोडण्याच्या आमिषापोटी रचलेले थर कोसळून जखमी झालेल्या एकाही गोविंदाला अद्याप विम्याचा एक रुपयाही मिळालेला नाही. राज्य सरकारने लाखो रुपये खर्च करून गोविंदांना विम्याचे कवच दिले, मात्र उत्सव सरल्यानंतर विम्याचे संरक्षण मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या संघटना आणि संबंधित गोविंदा पथकांच्या अनास्थेमुळे अनेक जायबंदी गोविंदाच्या वैद्याकीय उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांना पदरमोड करावी लागत आहे.*मुंबई-ठाण्यासह राज्यात २७ ऑगस्ट रोजी दहीकाला उत्सव साजरा झाला. उंच थर रचून दहीहंडी फोडण्यासाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. उत्सवानिमित्त पारितोषिकाच्या रुपात बक्कळ पैसे कमविण्याच्या आमिषापोटी गोविंदा पथकांमध्ये उंच थर रचण्याची अहमहमिका लागली होती. महिनाभर रात्रीचा जागर करीत मानवी मनोरे रचण्याचा सराव करणाऱ्या पथकांनी दहीकाल्याच्या दिवशी आठ-नऊ थर रचून बक्षिसाची रक्कम पदरात पाडून घेतली. मात्र, त्याचे अनुकरण करण्याच्या नादात अनेक छोट्या गोविंदा पथकांतील गोविंदावर थर कोसळून जायबंदी होण्याची नामुष्की ओढवली.गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारने मुंबई – ठाण्यासह राज्यातील तब्बल ७५ हजार गोविंदांना अटी-शर्तीसापेक्ष विम्याचे संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र राज्य गोविंदा दहीहंडी असोसिएशनने ९२२ पथकांमधील ७५ हजार, वसई-विरार महानगरपालिकेने ९९ पथकांतील सहा हजार, दहीहंडी असोसिएशनने ५१ पथकांतील २८१८, तर थेट आलेल्या २५२ पथकांतील १६ हजार ३२० अशा एकूण सुमारे एक हजार ३२४ गोविंदा पथकांतील तब्बल एक लाख १३८ गोविंदांना ‘ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनी’ने विम्याचे संरक्षण दिले. त्यासाठी राज्य सरकारने तब्बल ५६ लाख २५ हजार रुपये खर्च केले. सरकारने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या माध्यमातून हा निधी ‘ओरिएंटल इन्श्यूरन्स कंपनी’कडे जमा केला. गोपाळकाल्याच्या दिवशी सरकारी, खासगी आणि महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी २४५ गोविंदा आले होते. त्यापैकी २१३ गोविंदांवर उपचार करून घरी पाठविण्यात आले. तर थर कोसळून गंभीर जखमी झालेल्या ३२ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.*गोविंदा पथकेही अनभिज्ञ*गोपाळकाला पार पडल्यानंतर आजतागायत ओरिएंटल इन्श्यूरन्स कंपनीकडे केवळ १२० जायबंदी गोविंदांनी विम्याच्या दाव्यासाठी अर्ज सादर केला. यापैकी चार गोविंदांचे दावे तयार करण्यात आले. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेच सादर करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दावे तयार होऊनही संबंधित गोविंदांना विम्याचे पैसे मिळू शकलेले नाहीत. तसेच उर्वरित ११६ गोविंदांनी किंवा त्यांच्या गोविंदा पथकांनी संपर्कच साधलेला नाही. गणेशोत्सवानिमित्त अनेक जण गावी जातात. त्यामुळे सादर केलेल्या अर्जांवरील पुढील प्रक्रिया करणे अवघड होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button