
मुंबई विद्यापीठाच्या आंतरविभागीय स्पर्धेस दिमाखात प्रारंभ डीबीजे महाविद्यालयात ४८ बुद्धिबळ पटू लावणार कस : ३० आंतरराष्ट्रीय गुणांकित खेळाडूंचा सहभाग.
मुंबई विद्यापिठाच्या आंतर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन आज दि. ०२ सप्टेंबर रोजी चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात पार पडले. या वर्षातील ही पहिलीच आंतर विभागीय स्पर्धा असून सदर स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे व कोकण अश्या चार विभागातील निवड झालेले प्रत्येकी ६ मुले व ६ मुली अश्या ४८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ठाण्याच्या फिडे मास्टर अनिरुद्ध पोतवाड याला स्पर्धेचे अग्रमानांकन देण्यात आले असून फिडे रेटिंग प्रणाली नुसार मुंबई शहरच्या अथर्व जाईल याला दुसरे व नील शिंत्रे यास तृतीय मानांकन देण्यात आले आहे. मुलींच्या गटात मुंबई शहरच्या वूमन कँडिडेट मास्टर क्रिती पटेल हिला अग्रमानांकन देण्यात आले असून अव्रील डेविड हिला द्वितीय तर युती पटेल हिला तृतीय मानांकन देण्यात आले आहे.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. मनोज रेड्डी , स्पर्धेचे निवड समिती अध्यक्ष श्री. चंद्रकांत नाईक, उप प्राचार्य डॉ. चेतन आठवले, आंतरराष्ट्रीय पंच व राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक विवेक सोहनी, वरिष्ठ महाविद्यालयाचे जिमखाना चेअरमन डॉ. सम्राट माने, कनिष्ठ महाविद्यालयाचे जिमखाना चेअरमन प्रा.विलास जोशी, जिमखाना विभाग प्रमुख श्री. वामन जोशी, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. अनिल कलकुटकी यांच्यासोबत कोकण झोन सचिव व या स्पर्धेचे निवड समिती सदस्य श्री. शशांक उपशेटे उपस्थित होते. दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व पटावर चाल करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आयोजित केली जात असून एकूण ५ फेऱ्या खेळविल्या जाणार आहेत. त्यातील दोन फेऱ्या अंती मुंबई शहर व ठाणे विभागाने वर्चस्व दाखवले असून उद्या दि. ३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या डावांत मुंबई उपनगर व कोकण विभागाला मुसंडी मारण्याची संधी आहे. ह्या स्पर्धेत निवड झालेले खेळाडू विद्यापीठाचे नेतृत्व अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहेत. विद्यापीठ आणि जिमखाना विभाग सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, येणाऱ्या वर्षांत ह्या स्पर्धांना अधिक बक्षिसे व खेळाडूंना त्यांच्या अपेक्षांचा विचार करून यथायोग्य सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे असे आपल्या मनोगतात मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज रेड्डी यांनी सांगितले.
