पीओपी गणेशमूर्ती बंदीतून रत्नागिरी न.प.ला मोठा दिलासा
नुकताच तोंडावर आलेला गणेशोत्सव आणि पीओपी मूर्तीवर घालण्यात येणारी बंदी हा विषय समोर आल्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेला त्याची नोटीस बजावण्यात आली होती. आणि नगर परिषदेच्यावतीने ऍड. राकेश भाटकर यांनी बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयाने आता तात्पुरत्या स्वरूपात जरी दिलासा दिला असला तरी पुढील वर्षापासून मात्र याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच पीओपी गणेशमूर्ती बनवणार्या कारखानदारावर प्रदूषण कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्याचे संकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले आहेत. मात्र यावर्षी पीओपी गणेशमूर्ती बनवणार्या कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ मे २०२० रोजी पीओपी गणेशमूर्ती बनवण्यास तसेच वापरण्यासही बंदी घातली होती. तसेच मातीचे गणपती वापरणे व बनविण्यासाठी सक्तीचे करावे, अशा प्रकारची नियमावली बनवण्यात आली होती. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने अनेकवेळा महानगरपालिका तसेच पालिका यांना निर्देश दिले होते. त्या निर्देशाचे पालन होत नव्हते. यामुळे ठाणे येथील रहिवासी रोहित जोशी यांनी संगमेश्वर, रत्नागिरीतील रहिवासी राजेंद्र जाधव यांच्यासोबत जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर दाखलल केली होती. या याचिकेत पीओपी मूर्तीवरती बंदी आणावी व तशा प्रकारच्या सूचना नगरपालिका तसेच महानगरपालिका व महाराष्ट्र शासन यांना देण्यात यावा, अशी याचिकेमध्ये मागणी करण्यात आली होती. प्रकरणाची नोटीस रत्नागिरी नगर परिषदेलाही बजावण्यात आली होती. www.konkantoday.com