रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका बुडाली,नौकेवरील दोन खलाशांना कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत वाचवले
सध्या समुद्र खवळला असल्याने अनेक मच्छीमारी नौका किनाऱ्यावर उभे आहेत त्यातून काही नौका मच्छीमारीसाठी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका गुरुवारी सायंकाळी बुडाली. खराब वातावरणामुळे नौकेत पाणी भरल्याने ही दुर्घटना घडली.नौकेवरील दोन खलाशांना कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले.समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र देखील खवळला आहे. पाण्याला करंट मिळत आहे. याचाच फटका पूर्णगड समुद्रात मासेमारी करणाऱ्या नौकेला बसला आहे. विनोद भागवत नामक मालकाची ही नौका असल्याची माहिती मिळाली आहे. ही नौका लोखंडी होती असे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या मासेमारी नौकेवर दोन खलाशी होते. पूर्णगड समुद्रात १२ वाव अंतरावर ही नौका मासेमारी करत होती. यावेळी समुद्रातील वातावरण खराब झाल्याने बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. बोटीत पाणी भरण्यास सुरुवात होताच बोटितील खलाशांनी तत्काळ बोटीवर चढून मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर मत्स्य विभागाशी संपर्क केला.त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी आनंद पालव यांनी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीसाठी कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांनी खलाशांच्या रेस्क्युसाठी हेलिकॉप्टर रवाना केले. अखेरच्या क्षणी हेलिकॉप्टरच्या मदतीने बुडणाऱ्या बोटीवरील दोघा खलाशांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले.