रत्नागिरीत उद्या भंडारी समाजाचे महाधिवेशन
*. रत्नागिरी महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मोठय़ा संख्येने वसलेल्या भंडारी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक विषयांवर विचार मंथनासाठी उद्या रत्नागिरीत भंडारी समाजाचे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या महाअधिवेशनामध्ये समाजहिताचे काही महत्वाचे ठराव समंत केले जाणार आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या महा अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर असणार आहेत. रविवारी सकाळी १० वाजता स्वा. सावरकर नाट्यगृह येथे भंडारी महाअधिवेशनाचे उद्घाटन होईल. यापूर्वी सकाळी ९ वाजता कॅप्टन आशुतोष आपणकर हे विद्यार्थांना जलवाहतुकी तील नोकऱ्या कश्या मिळवाव्यात याचे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी दहा वाजता केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या महाअधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येईल. या महाअधिवेशनाला एलआयसीचे निवृत्त एमडी एस. बी. मायनाक, उद्योजक पुष्कराज कोले, आशिष पेडणेकर, कोकण म्हाडाचे माजी सभापती रमेश कीर, विवेक नार्वेकर, तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, कुमार शेट्ये, प्रसन्न आंबुलकर, कॅप्टन दिलीप भाटकर, सुनील भोंगले, राजेश कोचरेकर, प्रभाकर वाईरकर, गुरुनाथ मिठबावकर आणि राजन नार्वेकर, नाना हळदणकर , नरेंद्र गावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रविवारी सकाळी 09:00 ते सायं. 5:00 यावेळेत येथील स्वा. वि.दा.सावरकर नाटय़गृह रत्नागिरी येथे होणाऱ्या महाअधिवेशनामध्ये शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. यामध्ये सकाळी ११.१५ वाजता विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता भंडारी नारीशक्ती परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता भंडारी समाजाची आजची स्थिती आणि उद्याचे भविष्य या विषयावर विविध ठिकाणाहून आलेले भंडारी मंडळांचे अध्यक्ष आपली मते व्यक्त करतील. यानंतर भंडारी समाजाच्या हिताचे ठराव या अधिवेशनात संमत करण्यात येणार आहेत. सायंकाळी पाच वाजता अध्यक्षीय भाषणाने अधिवेशनाचा समारोप केला जाणार आहे.