मोठी बातमी! भारताचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर VIDEO पोस्ट करत दिली माहिती
टीम इंडियाचा ‘गब्बर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. शिखरने आपल्या अधिकृत X या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. निवृत्तीची घोषणा करताना त्याने चाहत्यांचे आभार देखील मानले आहे.सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओत शिखर धवन म्हणतो, “मी सध्या अशा वळणावर उभा आहे, जिथून मागे वळून पाहताना फक्त आठवणी दिसतात. तसेच पुढे पाहताना संपूर्ण जग दिसते. टीम इंडियाकडून क्रिकेट खेळावे, असे माझे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले आहेत. मला सहकार्य करणाऱ्या लोकांचा मी आभारी आहे”.”माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक, माझा संघ आणि ज्यांच्यासोबत मी अनेक वर्षे क्रिकेट खेळलो. या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली त्यांचा मी आभारी आहे . मला एक कुटुंब मिळाले, मला नाव मिळाले आणि त्यात तुम्हा सर्वांचे प्रेमही मिळाले. पण म्हणतात पुढे जाण्यासाठी पाने उलटणे आवश्यक आहे आणि मी तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे”, असंही शिखर धवनने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.*शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द*दरम्यान, निवृत्तीची घोषणा केल्यानंतर गब्बरचा क्रिकेटचा प्रवास संपला असून तो आता भारतीय संघाकडून खेळताना दिसणार नाही. धवनने 2010 साली भारतीय संघासोबत क्रिकेट प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने तब्बल 14 वर्ष आपल्या फलंदाजीने टीम इंडियाला योगदान दिले.धवनने कसोटी फॉर्मेटमध्ये भारतासाठी 2315 धावा केल्या. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवनच्या नावावर 6793 धावांची नोंद आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटमध्येही त्याने चांगलीच छाप पाडली होती. धवनने आपल्या बॅटने टी-20 मध्ये 1759 धावा केलेल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत. त्याने भारतासाठी 34 कसोटी, 167 एकदिवसीय सामने आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत.