संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ योजनांसाठी कर्जप्रस्ताव दाखल करावेत रत्नागिरी, दि.23 (जिमाका): संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित यांग्यामार्फत अनुसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या (एन.एस.एफ.डी.सी., नवी दिल्ली) विविध योजना राबविल्या जातात. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरिता योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, मुदती कर्ज योजना, महिला समृध्दी योजना, लघुऋण वित्त योजना, महिला अधिकारीता योजना, शैक्षणिक कर्ज योजना, सुविधा ऋण योजना, उत्कर्ष ऋण योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) समाजातील असावा. तसेच अर्जदाराने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराने आवश्यकतेनुसार कागदपत्रांची पूर्ण पुर्तता करून वरील शासकीय योजनेंचे तीन प्रतीत स्वतः अर्जदाराने मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कर्ज प्रस्ताव दाखल करावेत. त्रयस्थ / मध्यस्थांमार्फत कर्ज प्रकरणांचे अर्ज देण्यात अथवा स्वीकारण्यात येणार नाहीत. कर्ज प्रस्तावासाठी अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत. अर्ज पूर्ण भरलेला असावा. जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (रुपये तीन लाख पर्यंत), रहिवाशी दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक दाखला, तीन फोटो, लाभार्थाचा उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थाचा सिबील क्रेडीट स्कोअर (५०० च्या पुढे असावा), ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा पुरावा (जागेचे लाईटबील, टॅक्स / भाडे पावती / भाडे करारनामा / जागा वापर संमतीपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा इ., कागदपत्रे खरी असल्याबाबत लाभार्थ्यांचा विनंती अर्ज व ज्या जागी व्यवसाय चालू आहे त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र, दोन सक्षम जामिनदार (नोकरदार किंवा मालमत्ताधारक / शेतकरी), सक्षम जामिनदारांपैकी नोकरदार असेल तर त्यांच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाही तर जामिनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र, ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र, व्यवसायासंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल (सी.ए. यांच्या सही व शिक्क्यासहीत), खरेदी करावयाच्या मालमत्तेच्या साहित्याचे जी.एस.टी. क्रमांक असलेले दरपत्रक (कोटेशन), अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र (रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरीसह), अर्जदाराचे तसेच जामिनदारांचे विहीत नमुन्यातील शपथपत्रे (रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरीसह), अर्जदार विवाहीत स्त्री असल्यास लग्नापुर्वीचे व लग्नानंतरच्या दोन्ही नावाची व्यक्त्ती एकच असल्याबाबत रु. १००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरीसह शपथपत्र, लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (link) बैंक खाते क्रमांक असलेल्या पासबुकची छायांकित प्रत. ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत महामंडळात यापूर्वी दाखल केलेले सर्व जुने कर्ज प्रस्ताव रद्द समजण्यात येतील. महामंडळाने जिल्ह्याकरिता निश्चित केलेल्या उद्दिष्टांपेक्षा जास्तीची कर्ज प्रकरणे प्राप्त झाल्यास १६ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने केली जाईल. योजनांचे कर्ज प्रस्ताव 20 सप्टेंबर 2024 पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळता) कार्यालयीन वेळेत जिल्हा कार्यालय, रत्नागिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कुवारबांव, ता. जि. रत्नागिरी या ठिकाणी सर्व योजनांचे कोरे अर्ज वाटप व स्वीकारण्यात येतील. इच्छुक अर्जदारांनी सोबत येताना मूळ आधारकार्ड घेऊन येणे आवश्यक राहील. जिल्ह्यातील समस्त चर्मकार समाज बांधवांनी (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, प्रविण के. जाहीर यांनी केले आहे.