
कोकणातून गाईंना कत्तलीसाठी नेणार्यांना दिली अशीही शिक्षा…
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथे दोन वर्षांपूर्वी बोलेरो पिकअप गाडीतून सात गाईंची वाहतूक होत असताना ग्रामीण पोलिसांनी पकडले होते. गाईंना वाईट वागणूक देत वाहतूक करणार्या दोन आरोपींनी अनोखी शिक्षा मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने दिली आहे. या गाईंच्या संगोपनासाठी प्रत्येक आरोपीने प्रतिदिन 100 रुपये द्यावेत, असा निकाल दिला. त्यामुळे प्रत्येक आरोपीला प्रतिदिन 700 रुपये द्यावे लागणार आहेत. ग्रामीण पोलिसांनी 20 जून 2020 रोजी निवळी येथे कारवाई करून कोल्हापुरातील दोन आरोपींना अटक केली होती. याप्रकरणी हंसराज विलास चांदणे (वय 29, रा. मलकापूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर), रामचंद्र साधू सोने (40, रा.आरुळ, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली. त्यांची गाडीही जप्त करण्यात आली. गाडीमध्ये सात गाई कोंबून भरण्यात आल्या होत्या. त्यांचे तोंड आणि शिंगे नायलॉनच्या दोरीने बांधून त्या वाहनाच्या अरूंद हौद्यातून क्रूरपणे वागणूक देत वाहतूक केली जात होती, असा आरोप करण्यात आला होता. कत्तलीसाठी नेण्याच्या उद्देशाने या गाईंची वाहतूक केली जात होती, असेही आरोपपत्रात म्हटले होते. या खटल्याप्रकरणी न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहे. सोडवलेल्या गाईंना एस. टी. गुंदेचा चॅरिटेबल ट्रस्टच्या गोशाळेत ठेवण्यात आले आहे. याठिकाणी न्यायालयाने दिलेल्या निकालाची रक्कम आरोपींनी द्यायची आहे. 21 जून 2022 पासून प्रतिदिन प्रत्येक आरोपीने गाईंच्या संगोपनासाठी प्रत्येकी 700 रुपये द्यायचे आहेत. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल एस. बी. कांबळे यांनी तपास केला.