उक्षी घाटात ट्रक अडकल्याने वाहतूक खोळंबली
रत्नागिरी तालुक्यातील उक्षी घाट येथे मालवाहक ट्रक अडकल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. घाटात सुदैवाने ट्रक चालकाने प्रसंगावधान दाखवित ट्रकवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा ट्रक ४०० फूट खोल दरीत कोसळून दुर्घटना घडली असती. हा ट्रक बाजूला करण्याचे प्रयत्न रात्री उशीरापर्यंत ग्रामस्थांकडून करण्यात येत होते.स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावरून ट्रक मुंबईच्या दिशेने जात होता. निवळी येथे आल्यानंतर त्याने गुगल मॅपचा आधार घेतला. यात त्याला उक्षी घाटातून पुढील मार्ग असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याने ट्रक उक्षी घाटातून जाईल की नाही याचा विचार न करता ट्रक या मार्गाने नेण्याचा प्रयत्न केला. उक्षी घाटातून जाताना एका अवघड वळणावर तो फसला. www.konkantoday.com