माझी लाडकी बहीण राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम मतदार संघनिहाय लाभार्थ्यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्यक्रम घ्या-जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, दि. 16 (जिमाका) : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी, पात्र महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्या पुण्यात होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी विधान सभा मतदार संघनिहाय कार्यक्रमांचे उद्या शनिवारी आयोजन करावे. लाभार्थ्यांच्या उपस्थितीत पुण्यातील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवावे, अशा सूचना एम देवेंदर सिंह यांनी दिल्या.* जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात याबाबत आज बैठक झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्रीकांत हावळे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते. क्षेत्रीय स्तरावरील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी उद्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम दुपारी 1 वाजता होणार आहे. त्याचबरोबर दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठ सभागृहात, चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र सभागृहात, राजापूर येथील गजानन मंगल कार्यालयात आणि गुहागर येथे उद्या हे कार्यक्रम होणार आहेत. विधान सभा मतदार संघ क्षेत्रनिहाय समिती अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम घ्यावेत, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.000