रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षकांची सुमारे ९०० पदे रिक्त
जिल्हा परिषदेच्याशिक्षकांची १० टक्के पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड पालकांमध्ये सुरू आहे. तरीही जिल्हा परिषद प्रशासनाने आंतरजिल्हा बदली झालेल्या परजिल्ह्यातील १५० शिक्षकांना कार्यमुक्त केले.त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांचा भार अधिक वाढणार आहे.जिल्ह्यात शिक्षकांची सुमारे २ हजारपेक्षा जास्त पदे रिक्त होती. मे महिन्यापासून आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने त्यांची रिक्त पदांमध्ये भर पडली. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यामध्ये १ हजार ३४ शिक्षकांची पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ९९७ शिक्षकांची पदे भरण्यात आली.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, ३६७ पैकी ३४० पदे भरण्यात आली आहेत. या भरती प्रक्रियेत एकूण १ हजार ४३७ शिक्षकांची पदे भरण्यात आली. शिक्षक भरतीनंतरही सुमारे ७५० शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. त्यातच १५० शिक्षक कार्यमुक्तकरण्यात आल्याने शिक्षकांची सुमारे ९०० पदे रिक्त झाली आहेत.