
ओणी-अणुस्कूरा मार्गाची दुरावस्था
राजापूर-कोल्हापूरला जोडणार्या ओणी-अणुस्कूरा मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडी, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले भले मोठे खड्डे, यामुळे या मार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. शासन, प्रशासनासह याकडे लक्ष देत नसल्याने वाहन चालक, प्रवासी तसेच परिसरातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील जनता कमालीची संतप्त झाली असून या मार्गावर वाढलेली झाडी तोडणे व खड्डे भरण्याचे काम तत्काळ न झाल्यास रस्त्यातील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.राजापूर तालुक्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा महत्वाचा मार्ग म्हणून ओणी-अणुस्कूरा मार्ग ओळखला जातो. पुणे मुंबईवरून रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्याकडे जाणारे प्रवासीही या मार्गाचा उपयोग करीत असल्याने या मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र सद्यस्थितीत या रस्त्याच्या दुतर्फा मोठी झाडी वाढलेली असून वळणामध्ये समोरून येणारी वाहनेही दिसून येत नाहीत. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही रस्त्यावर लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे. www.konkantoday.com