
प्रतिक चव्हाण यांनी *केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असल्याने सर्वंकष चौकशी करण्याचे काम प्रगतीपथावर, मात्र नाहक बदनामी थांबवा, विद्यापीठाचे आवाहन
कृषि महाविद्यालय दापोली येथे चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील ३ विद्यार्थ्यांनी शारिरीक व मानसिक छळ केल्याची तक्रार या विद्यार्थ्याने एका महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडे केली असल्याची बातमी माध्यमात प्रसिद्ध झाल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या संदभांत या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांनी वस्तुस्थितीची माहिती दिली आहे.कृषी महाविद्यालय, दापोली येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये सत्र ७ मध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी प्रतिक सुहास चव्हाण याने त्याचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याबाबत ३१ जुलै रोजी कुलसचिव यांच्यामार्फत सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, दापोली यांच्याकडे केली होती. प्रतिक सुहास चव्हाण आणि इतर १० विद्यार्थ्यांना माणगांव, कोशींबळे, रोहा या केंद्रांवर रावे कार्यक्रमांतर्गत सत्र ७ मधील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठविण्यात आलेले आहेत. अर्जदार प्रतिक सुहास चव्हाण यांना गैरअर्जदार विद्यार्थी नामे सौरभ सहदेव शेडगे, पार्थ संतोष गुरसाळे, आणि वैभव सुरेश फुलसुंदर यांनी शारिरीक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार केली आहे.सदरचा प्रकार हा कोशींबळे, ता. माणगांव, जि. रायगड येथे घडला आहे. याप्रकरणी तातडीने महाविद्यालय स्तरावर प्राथमिक चौकशी करण्यात आली असून खबरदारी, शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गैरअर्जदार तीनही विद्यार्थी यांच्या तातडीने दुरवरच्या ठिकाणी बदल्या करण्यात आलेल्या आहेत. प्रतिक चव्हाण यांनी केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे असल्याने सर्वंकष चौकशी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे सदर बाब रँगींगअंतर्गत येते किंवा कसे, याबाबत चौकशीअंती निश्चित होणार आहे. मात्र असे असताना सुद्धा काही वृत्तपत्रे, प्रसारमाध्यमे यामध्ये महाविद्यालयांमध्ये रँगींगची घटना घडलेली आहे. अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. यामुळे कृषी महाविद्यालय, तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांची बदनामी होत आहे. कृषी महाविद्यालय, दापोली हे कोकणातील एकमेव नामांकीत दर्जेदार कृषी शिक्षण देणारे शासकीय महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्राधान्याने आणि नियमितपणे ओढा असतो. www.konkantoday.com