
जिल्ह्यातील पाचही आमदार महायुतीचे असणार: ना. सामंत, युतीच्या मेळाव्यात मोठ्यांपासून स्थानिक भाजप नेते गायब
रत्नागिरी:-* राज्यात गेली अडीच वर्ष मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जनतेसाठी आवश्यक योजना राबवून उत्तम काम केले आहे. येणार्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी तिनही प्रमुख पक्षांसह सहयोगी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आपण एक संघ राहिलो तर महाविकास आघाडीला पराभूत करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. आपल्याला सत्ता आणायची आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवावे. मुंबईसह कोकणात ७० जागा मिळतीलच परंतु जिल्ह्यातील पाचही आमदार महायुतीचे असतील असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी महायुती मेळाव्यात व्यक्त केला. रत्नागिरी शहरातील जयेश मंगल पार्क येथे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योग मंत्री ना.उदय सामंत, उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रसाद लाड, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, शशिकांत चव्हाण, सौ.उल्का विश्वासराव, महायुती समन्वयक सचिन जोशी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. तर शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर यांनी फोनवरून महायुती कार्यकर्त्यांची संवाद साधला.मेळाव्याला संबोधित करताना ना.सामंत म्हणाले, निवडणुकीला सामोरे जात असताना तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये एक वाक्यता असायला हवी. आपली ताकद खूप मोठी आहे. आपण सर्वांनाच पराभूत करू शकतो. राज्यात आपली सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकसंघ राहण्याची आवश्यकता आहे. दि. २० ऑगस्टपासून यात्रेची सुरुवात होणार आहे. सिंधुदुर्गपासून गडचिरोलीपर्यंत ही यात्रा चालेल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ही यात्रा जाणार आहे. तर याच कालावधीत कोकणात एक भव्य सभा घेण्यात येणार असून सुमारे एक लाख मतदार या सभेला येतील, असे नियोजन आपण सर्वांनी करायचे आहे. पक्षाचे प्रमुख नेते या सभेला मार्गदर्शन करतील. या विधानसभा निवडणुकीत आपल्याला महायुतीची ताकद दाखवण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र मोदींचा आहे, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. आपापसातील मतभेद असतील तर ते बाजूला ठेवून आपल्याला आपल्या पक्षाचे नेते जो आदेश देतील त्याची अंमलबजावणी करायची आहे. आता भांडण्याचे दिवस नाहीत तर लढण्याचे दिवस आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघ महायुतीचे होतील अशा पद्धतीने नियोजन करून सर्वांनी काम करायचे आहे. आजच्या महायुती मेळाव्याला बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण, खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार बाळासाहेब माने हे त्यांच्या भागातील इतर कार्यक्रममुळे येथे उपस्थित नाहीत. याचा गैर अर्थ कोणीही काढू नये असा सल्लाही ना.सामंत यांनी यावेळी दिला. यावेळी आमदार प्रसाद लाड, महायुती समन्वयक सचिन जोशी, आ.अनिकेत तटकरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या समन्वय मेळाव्यात भाजपच्या प्रमुख नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. लोकसभा निवडणुकीत प्रचारात अग्रभागी असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण, विद्यमान खासदार नारायण राणे, आमदार नितेश राणे, भाजप नेते निलेश राणे, रत्नागिरी विधानसभेचे माजी आमदार बाळासाहेब माने या प्रमुख नेत्यांनी महायुती मेळाव्याकडे पाठ फिरवल्यामुळे याचा नेमका अर्थ काय? अशी चर्चा उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील नेतृत्व करणारे प्रमुख नेतेच महायुती मेळाव्याला उपस्थित नसतील तर याचे पडसाद कसे उमटणार हे येणार्या विधानसभा निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.