जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महाआक्रोश मोर्चाएकच मिशन जुनी पेन्शन घोषणेने दुमदुमली रत्ननगरी निवासी जिल्हाधिकारी श्री सुर्यवंशी साहेबांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.
एकच मिशन जुनी पेन्शन, रद्द करा, रद्द करा शिक्षण सेवक पद रद्द करा. या घोषणांनी रत्नागिरी शहर आज दुमदुमले. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व जुनी पेन्शन संघटना समन्वय समिती यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच शिक्षण सेवक पद रद्द करणे यांसह विविध मागण्यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चाची सुरुवात माळ नाका रत्नागिरी येथून झाली. जिल्हाधिकारी कार्यालय येथे या मोर्चाची सांगता होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले. 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी परिभाषित पेन्शन योजना सरकारने लागू केली आहे. यात देखील बदल करण्यात येऊन आता जीपीस या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. परंतु यामुळे कर्मचाऱ्यांचे म्हातारपणीचे आयुष्य अंधकारमय बनले आहे. त्यामुळे 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह शिक्षण सेवक योजना रद्द करावी, DCPS खात्यात जमा असणाऱ्या रक्कमांवर आजपर्यंतचे व्याज मिळावे, सुधारित संच मान्यता निकष रद्द करावेत, शिक्षक भरती च्या जाचक अटी रद्द कराव्यात, बी एल ओ कामे शिक्षकांकडून काढून अन्य यंत्रणेमार्फत करून घ्यावेत, एम एस सी आय टी ची मुदत वाढवून मिळावी, नवभारत साक्षरता अभियानसह अशैक्षणिक व ऑनलाईन कामे इतर यंत्रणे मार्फत करून घ्यावीत. अशा मागण्यांसह धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य शासकीय – निम शासकीय कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, त्याचबरोबर शिक्षकेत्तर संघटनांनी सुद्धा या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दर्शवून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या होता. या आंदोलनात रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.