
ग्रामीण भागात उत्तम खेळाडू तयार झाले तर ऑलम्पिक मधील भारताचे स्थान नक्कीच उंचावेल -निवृत्त वायूसेना अधिकारी मा. हेमंत भागवत.
” ग्रामीण भागात उत्तम खेळाडू तयार झाले तर ऑलम्पिक मधील भारताचे स्थान नक्कीच उंचावेल -“निवृत्त वायूसेना अधिकारी मा. हेमंत भागवत “चिपळूणच्या सांस्कृतिक वैभवाला ज्ञान प्रबोधिनीच्या क्रीडा प्रकल्पाने पूर्णत्व ” निवृत्त वायूसेना अधिकारी मा. हेमंत भागवत यांचे मत” ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुल आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येत असलेल्या ‘क्रिडाकुल ग्रामीण खेळाडू विकसन ‘ प्रकल्पाच्या शुभारंभाचा कार्यक्रम दि. 6 ऑगस्ट रोजी चिपळूण येथे क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी टाटा ट्रस्टच्या क्रीडा विभागप्रमुख श्रीमती नीलमताई बाबरदेसाई आणि ज्ञान प्रबोधिनी क्रीडाकुलचे प्रमुख डॉ. मनोजराव देवळेकर, चिपळूण केंद्राचे प्रमुख सीए श्री. स्वानंद हिर्लेकर इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. निवृत्त वायू सेना अधिकारी श्री हेमंत भागवत यांनी अध्यक्षस्थान भूषवले. ग्रामीण भागांतील मुलांना योग्य संधी आणि दिशा मिळाल्यास ऑलिंपिक मध्ये पदक मिळवण्याचे स्वप्नही ते पूर्ण करतील असा विश्वास या वेळी बोलताना मान्यवरांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात मा. भागवत सरांनी मुलांना आर्थिक पार्श्वभूमी, कौटुंबिक मर्यादांनी हताश न होता मोठी स्वप्ने आपण पाहू शकतो असा विश्वास दिला. चिपळूणच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा हा प्रकल्प ठरेल अशा शुभेच्छा त्यांनी प्रकल्पाला दिल्या. ग्रामीण भागातील मुलांना शालेय वयापासून खेळासाठी प्रोत्साहन आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. चिपळूण , संगमेश्वर आणि खेड तालुक्यातील आंबडस, सती, आकले, भोम, माखजन, पेढे अशा सहा ठिकाणी या वर्षी हा प्रकल्प घेतला जाणार आहे. स्थानिक युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना गावांत प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आणि समुपदेशकही नेमण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ अध्यक्ष श्री. कळंबे सर , सह्याद्री शिक्षण संस्थेचे श्री निर्मळ सर, तसेच विविध संस्थांचे संचालक, शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पातील सुमारे ३० सहभागी मुली – मुलेही उपस्थित होती. यावेळी सर्व उपकेंद्रांना मान्यवरांच्या हस्ते क्रीडासाहित्य प्रदान करण्यात आले. प्रकल्प समन्वयक श्री. तुषार कदम यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञान प्रबोधिनीचे कोकण विस्तार प्रमुख श्री आदित्य शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन सौ मेधा लोवलेकर यांनी केले.