कारवार आणि गोव्याला जोडणारा सुमारे ४० वर्ष जुना पूल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला
कर्नाटकातील कारवार आणि गोव्याला जोडणारा सुमारे ४० वर्ष जुना पूल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला आहे. या पुलाच्या बाजुलाच नवा पूल उभारण्यात आला असून या नव्या पुलाच्या सुरक्षेची समिक्षा करण्यात येणार आहे.जुन्या पुलावरून वाहतूक सुरु होती. या घटनेत एक जण जखमी झाला आहे.काळी नदीवरील हा पूल कोसळला असून रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. काळी नदीवरील हा पूल कारवार शहराजवळ आहे. हा पूल १९८३ मध्ये बांधण्यात आला होता. या पुला जवळच प्रसिद्ध पर्यटनाचे आकर्षण असलेला सदाशिवगड किल्ला आहे.हा पूल कोसळल्याने वाहतुकीवर काहीसा परिणाम होणार आहे. सर्व वाहतूक नव्या पुलावरून वळविण्यात आली आहे.एसडीआरएफची तुकडी रवाना करण्यात आली असून नव्या पुलाला यापासून काही धोका नाही ना याची तपासणी केली जाणार आहे. जुन्या पुलाचे अवशेष पाण्याच्या प्रवाहासोबत नव्या पुलाला अडकण्याची शक्यता आहे. यामुळे नव्या पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.