ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवविच्छेदन गृहापर्यंत पोहचण्यासाठी करावी लागते मोठी कसरत
डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या जागा आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे आधीच तालुक्याची आरोग्ययंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे.आता ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या येथील शवविच्छेदन गृहापर्यंत पोहचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.राजापूर ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाच्या सुरू असलेल्या कामामुळे शवविच्छेदनासाठी ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ठेवावे लागत आहेत. येथील शवविच्छेदन गृहाबाहेर व रस्त्यावर वाढलेली झाडी, रस्त्यावर पसरलेला चिखल यामुळे शवविच्छेदन गृहापर्यंत मृतदेह नेणाऱ्यांना आणि शवविच्छेदन करण्यासाठी जाणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना तेथे पोहचण्यासाठी प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागत आहे. अपघाती निधन, आत्महत्या, विषबाधा व अन्य कारणांनी होणाऱ्या मृत्यूमुळे त्या मृतदेहाचे विच्छेदन शासकीय रुग्णालयात केले जाते. येथील राजापूर ग्रामीण रुग्णालयामध्ये विच्छेदन केले जाते; मात्र सध्या राजापूर ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छदेन गृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने सात किमीवर असणाऱ्या ओणी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी न्यावे लागत आहे. ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवविच्छदेन गृहापर्यंत प्रत्यक्ष पोहचण्यासाठी गर्द वाढलेली झाडी, शवविच्छेदन गृहाला वेढलेले जंगल आणि रस्त्यावर पसरलेल्या चिखलाच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे.