कामगारांचे लाटलेले १० कोटी परत मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! : विजयकुमार जैन

प्रशासन आणि मनुष्यबळ पुरवठा कंत्राटदार यांनी कंत्राटी कामगारांचा आजवरचा लाटलेला पगार जोवर कामगारांच्या बॅंक खात्यात येत नाही, तोवर स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार कायद्याने वागा लोकचळवळीच्या लेबर राईटस् चे रत्नागिरी समन्वयक विजयकुमार जैन यांनी व्यक्त केला आहे. या विषयावर जोवर मुख्याधिकारी तुषार बाबर आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोवर नियोजित बेमुदत उपोषण स्थगित करणार नाही, असाही इशारा जैन यांनी दिला आहे. रत्नागिरीतील अनेक विषयांना सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार जैन यांनी वारंवार वाचा फोडली आहे. नुकताच त्यांना शिंदे सेना समर्थकांकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यातच रत्नागिरी नगरपरिषदेतील मनुष्यबळ पुरवठा कंत्राटातील भ्रष्टाचाराबाबत त्यांनी निर्वाणीचा इशारा दिल्याने रनपा प्रशासन हादरलं आहे. जानेवारी, २०२४ पासून कंत्राटी कामगारांच्या शोषणाविरोधात लेबर राईटस् सातत्याने पत्रव्यवहार करीत आहे, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्याबरोबर लगेच प्रशासनाने मनुष्यबळ पुरवठ्याच्या निविदेत सुधारणा केल्याचा दावा करीत यापुढे कामगारांना नियमकायद्यानुसार वेतन मिळेल, अशा आशयाचे पत्र जैन यांना दिले. नियोजित उपोषण मागे घेण्याची विनंती सदर पत्रातून मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी जैन यांना केली आहे. मात्र, सदरच्या पत्राने जैन यांचे समाधान झालेले नाही. कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर हे स्वत: रत्नागिरीत येऊन लवकरच बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. एका कामगाराचे १० हजार असे २५० कामगारांच्या पगारातले दरमहा २५ लाख रुपये लाटले गेले आहेत.‌ कामगारांचे अंदाजित १० कोटी रुपये त्यांना परत मिळवून द्यायचे आहेत. हा त्यांच्या कष्टाचा पैसा आहे. हा पैसा मुख्य नियोक्ता या नात्याने नगरपरिषदेने चुकता करायचा आहे. तो त्यांनी कंत्राटदाराकडून वसूल करून द्यावा किंवा स्वत:च्या तिजोरीतून द्यावा, पण द्यावा लागणारच ! असं ठाम प्रतिपादन करत जैन म्हणाले की इथे नुसतं कामगारांचं शोषण नाही, तर तितक्याच रक्कमेचा हा भ्रष्टाचारही आहे. त्यामुळे कामगारांना परतफेड नाही मिळाली तर कंत्राटदार आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना तुरुंगात जाण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button