महसूल दिन पंधरवड्याचा शुभारंभ गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्याला पुरस्कार प्राप्त बनवा -जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह
रत्नागिरी, : गेल्या वर्षी महसूल विभागाच्या कामकाजामुळे जिल्ह्याला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे याही वर्षी पुरस्कार मिळायला हवेत. यासाठी सर्वांनी कामकाज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज महसूल दिन साजरा करुन, महसूल पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रांताधिकारी जीवन देसाई, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, महसूल विभाग हा महत्त्वाकांक्षी आहे. जनगणना, निवडणूक, नैसर्गिक आपत्ती, शासनाच्या विविध योजना राबविण्याची जबाबदारी या विभागावर असते. प्रमाणिकपणा, संवेदनशीलता ठेवून निर्णय देणे ही देखील जबाबदारी आहे. इतिहासापासून देखील कर गोळा करणारा महसूल विभाग महत्वाचा ठरला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 2 लाख 80 हजार पैकी 98 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मुख्य युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 1 हजार उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. काम करत असताना सर्वांनी आरोग्याकडे आणि आपल्या आनंदाकडेही लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले. पोलीस अधीक्षक श्री. कुलकर्णी म्हणाले, सर्वसामान्य जनतेची जिल्हा प्रशासनाविषयी आत्मियतेची आणि समाधानाची भावना आहे. नुकत्याच झालेल्या शांतता समितीमध्ये सदस्यांनी प्रशासनाचे अभिनंदनही केले आहे. जिल्ह्याला मोठ्या उंचीवर नेण्याचे काम सर्वांनी मिळून करु या, असे सांगून महसूल दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. बर्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गायकवाड, शिपाई संतोष चव्हाण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सर्वांचे स्वागत करुन प्रस्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. तहसिलदार तेजस्विनी पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.000