महाराष्ट्र सदनातील कँटीन आणि सुविधेबाबत शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
राजधानी दिल्लीतील मराठी माणसांचं हक्काच ठिकाण म्हणजे महाराष्ट्र सदन होय. दिल्ली दरबारी किंवा दिल्लीतील संसद भवनाकडे गेलेल्या मराठी माणसांची ओढ महाराष्ट्र सदनकडे असते.महाराष्ट्र सदनमध्ये आपला मुक्कमो ठेऊन ते आपली कामे मार्गी लावतात. मात्र, महाराष्ट्र सदनमधील इतर सुविधांबाबत कायमच तक्रारी आल्या आहेत. मुंबईत आमदार निवासात कार्यकर्ते येतात, राहतात. त्याचप्रमाणे राजधानी दिल्ली महाराष्ट्र सदनमध्ये कार्यकर्त्यांचा मुक्काम असतो. मात्र, येथील काही सुविधांवरुन आता चक्क खासदारानेच संताप व्यक्त केलाय. महाराष्ट्र सदनातील कँटीन आणि सुविधेबाबत शिवसेना (शिंदे) गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिण्यात आलं आहे. त्यामध्ये, सदनातील सुविधांच्या बोजवारा उडाल्याचा पाढाच त्यांनी वाचलाय. आता रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्र सदनमधील सोयी-सुविधांवरुन संताप व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिले आहे. उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने आपणास कळवू इच्छितो की, महाराष्ट्र शासनाने दिल्ली या ठिकाणी उत्कृष्ट असे “महाराष्ट्र सदन” उभारले आहे, यात जवळपास 132 खोल्या आहेत. अधिवेशनाच्या काळात, तसेच अन्य कामानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनता या ठिकाणी वास्तव्यास येतात. “महाराष्ट्र सदनाची” वास्तू जरी चांगली असली तरी या सदनामध्ये काही सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, असे म्हणत रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्र सदनमधील काही उणिवा दाखवून दिल्या आहेत.