कसोपच्या चेतन साळवीचा शेतीतून तरुणांसमोर आदर्श

रत्नागिरीनजीकच्या कसोप येथील चेतन साळवी या तरुणाने फुलशेती व भाजीपाल्याकडे अधिक लक्ष देऊन आदर्श निर्माण केला आहे. यातून तो महिन्याकाठी हजारो रुपये मिळवत आहे. नोकरीच्या शोधात फिरणार्‍यांसमोर त्याने आदर्श निर्माण केला आहे. चेतन साळवी याचे पदवीपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीतीलच गोगटे जोगळेकर कॉलेजमधून झाले आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर शेतीबरोबरच तो डीजेचा व्यवसायही करीत असे. परंतु शेतीमध्येच मन रमत असल्याने, त्याने शेतीलाच आपले करिअर बनवण्याचा निर्णय घेतला. आजोबा, वडील व काका पारंपारिक शेती व भाजीपाल्याची लागवड करीत असत. वडील व काकांच्या मार्गदर्शनाखाली पुढे चेतनने भाजीपाल्याच्या शेतीत अनेक प्रयोग करण्यास सुरुवात केली. बारमाही भाजी मिळेल असे नियोजन त्याने केले आहे. पावसाळ्यामध्ये दोन एकर परिसरात पडवळ, दोडका, कारली, काकडी, मुळा, पालाभाजी याची दरवर्षी लागवड केली जाते. उन्हाळ्यामध्ये वांगी, गवार, भेंडी, पडवळ, दोडका, कारली, काकडी अशा प्रकारे तीन एकर परिसरात लागवड केली जाते. पारंपरिक पध्दतीने पाच एकर भात शेतीमध्ये ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी करून सुमारे आठ खंडी म्हणजेच चार हजार आठशे किलो भाताचे हमखास मिळते. त्याचबरोबर तिनशे नारळाची झाडे असून महिन्याला 500 नारळाचे उत्पन्न मिळते. साडेचारशे आंबा कलमे व सत्तर काजू कलमांची लागवड करण्यात आली. भाज्यांपासून आंबा, नारळ यांना सेंद्रीय खतांच्या वापरावर जास्तीतजास्त भर देत असतो. शेतीलाच आर्थिक स्त्रोत बनवणार्‍या चेतन यांनी तरुण शेतकर्‍यांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button