शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत विवाह योजनेचा शेतमजूर, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : राज्यामध्ये “शुभमंगल सामुहिक/नोंदणीकृत (Ragistered Of Marriage) विवाह योजना” ही योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकरी/शेतमजूर यांच्या मुलीच्या सामुहिक / नोंदणीकृत विवाहासाठी आवश्यक मंगळसुत्र व इतर वस्तूची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे रुपये 25 हजार एवढे अनुदान देण्यास मान्यता दिलेली आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे यांनी केले आहे.
केवळ शेतकरी/शेतमजुर न ठेवता अ.जा./अ.जमाती /वि.ज. भ.ज./वि.मा.प्र. वगळता अन्य प्रवर्गातील एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या निराधार/परित्याक्ता आणि विधवा महिलांच्या केवळ ०२ मुलींच्या विवाहाकरीता पण या योजनेतंर्गत अनुदान देण्यात येते. शुभमंगल सामुहिक विवाह सोहळयाची योजना, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संस्था नोंदणी अधिनियम १८६० व सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेमार्फत राबविण्यात येते.योजनेच्या अटी व शर्ती वधू व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. विवाहावेळी वधूचे वय १८ वर्ष व वराचे वय २१ वर्ष पुर्ण असावे. वधू वरांना प्रथम विवाहासाठी हे अनुदान देय असेल, तथापि वधू विधवा किंवा घटस्फोटीत असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी अनुदान देय असेल. लाभार्थी हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून ७/१२ चा उतारा. लाभार्थी हा शेतकरी / शेतमजूर असल्याचा पुरावा म्हणून तलाठी /ग्रामसेवक यांचा दाखला. लाभार्थ्याच्या पालकाचे सर्व मार्गाने मिळणारे उत्पन्न रुपये १,००,०००/- च्या आत असावे. योजनेंतर्गत अनुदान मंजुरी मिळण्यासाठी अ.जा./अ.जमाती /वि.ज. /भ.ज./वि.मा.प्र. या प्रवर्गातील दांपत्ये पात्र राहणार नाहीत. कारण, त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच आदिवासी विकास विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत आहेत. बालविवाह प्रतिबंधक कायदा व हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पत्य कुटुंब यांच्याकडून झालेला नसावा. सामुहिक विवाह सोहळयासाठी किमान ५ व जास्तीत जास्त १०० दाम्पत्य असणे आवश्यक आहे. सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करणा-या स्वयंसेवी संस्थेने / स्थानिक स्वराज्य संस्थेने सामुहिक विवाह सोहळयात भाग घेतलेल्या जोडप्यांना विवाह झाल्यापासून एक महिन्याच्या आत, निबंधक विवाह नोंदणी याचे प्रमाणपत्र मिळवून द्यावे. विवाह सोहळयात भाग घेतलेल्या जोडप्यांचे विवाह नोंदणी पत्र सादर केल्याशिवाय लाभार्थी अनुदान मिळण्यास पात्र असणार नाहीत. सुधारीत शासन निर्णय दि.१४ मार्च २०२४ अन्वये प्रती जोडपे संस्थांना रु.२५००/- इतके अनुदान देय होईल. सुधारीत शुभमंगल नोंदणीकृत विवाह या योजने अंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळयास सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात (Office Of the Ragistered Marriage) जावून नोंदणीकृत विवाह (Ragistered Marriage) करतील त्यांना ही रुपये १०,०००/- इतके अनुदान मुलीच्या आईस दिले जाईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील सामुहिक विवाह सोहळा राबवू इच्छिणा-या स्वयंसेवी संस्थांनी तसेच नोंदणीकृत विवाह केलेले व विधवांच्या मुली यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय रत्नागिरी, जेलरोड जिल्हा उद्योग केंद्रा शेजारी ता.जि.रत्नागिरी दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२०४६१ यांच्याशी संपर्क साधावा.000