
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांसाठी ज्ञान प्रबोधिनीतर्फे “क्षमता संवर्धन कार्यक्रम”
ज्ञान प्रबोधिनी, संपर्क केंद्र, चिपळूण यांच्या मार्फत मागील 5 वर्षांपासून आपल्या जिल्ह्यामध्ये विविध शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम चालवले जात आहेत. शिक्षक प्रशिक्षण, विविध व्याख्याने, शालेय विद्यार्थांसाठी विविध शिबिरे आयोजित केली जातात. तरी येत्या काही दिवसात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांसाठी क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरात प्रामुख्याने तरुणांना स्वतःच्या क्षमता ओळखणे आणि त्या कशा वाढवायच्या या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी पुण्यातील तज्ञ मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
केंद्रामार्फत चालणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेताना या उपक्रमांमध्ये “छोटे वैज्ञानिक” हा उपक्रम चिपळूण मधील विविध शाळांमध्ये मोठ्या स्तरावर राबविण्यात येतो. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या हेतूने आजपर्यंत सुमारे 1000 विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे प्रयोग करून घेतले गेले. या उपक्रमात DBJ महाविद्यालयातील अनेक तरुण सहभागी होतात. तसेच दरवर्षी महाविद्यालयात विज्ञान मेळावा आयोजित केला जातो त्यामध्ये चिपळूण तालुक्यातील अनेक शाळांचा उत्साहपूर्ण सहभाग असतो. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. यासाठी पुण्याहून अनेक तरुण तज्ञ मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. याचबरोबर केंद्रामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल सहल, पक्षी निरीक्षण सहल इ. आयोजित केल्या जातात. “मातृभूमी परिचय” या उपक्रमाअंतर्गत भारतातील विविध ठिकाणांची तेथील संस्कृतींची ओळख करून घेण्यासाठी मातृभूमी परिचय सहल आयोजित केल्या गेल्या. याअंतर्गत अरुणाचल प्रदेश आणि दिल्ली या ठिकाणी मातृभूमी परिचय सहल नेण्यात आली. तसेच विद्यार्थांसाठी विद्याव्रत, नेतृत्व शिबीर, आरोग्य व्याख्याने, विक्री कौशल्य विकसन, शेतमजुरांशी संवाद, निर्माल्य व्यवस्थापन प्रशिक्षण, भारतीय समाज सेवा केंद्र आणि मराठी शाळा खेर्डी च्या विद्यार्थांसाठी विज्ञान सत्र असे अनेक उपर्कम केंद्रामार्फत राबवले गेले आहेत..
केंद्रामार्फत यावर्षी प्रथमच “Science investigatory workshop” हा एक महत्वाचा उपक्रम घेण्यात येणार आहे. पुणे येथील काही तज्ञ मार्गदर्शक तसेच चिपळूण मधील महाविद्यालयीन युवक हे workshop घेणार आहेत. हे 8 दिवसांचे शिबीर 8 वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वरूपात जून मध्ये आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी लागणारे साहित्य सहभागी विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात येणार आहे. तसेच आधी नमूद केल्याप्रमाणे तरुण युवकांसाठी आयोजित केलेल्या क्षमता विकास कार्यक्रमात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तरूणांनी सहभागी व्हावे असे आवाहन ज्ञान प्रबोधिनीकडून करण्यात येत आहे. ह्या कार्यक्रमातील सर्व सत्रे ही झूम मीटिंग या ऑनलाईन माध्यमातून होणार असून सर्व सत्रे प्रामुख्याने मराठी भाषेत होणार आहेत. या सत्रांचे कोणतेही शुल्क असणार नाही, पण सहभागी सदस्यांची पूर्ण उपस्थिती अपेक्षित असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. ३० मे २०२१ पासून दर रविवारी (एकूण ८ रविवार) – स. ११ ते दू. १२.३० या वेळात सत्र होणार आहेत. या शिबिरासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून प्रवेश मर्यादित असणार आहेत. प्रवेश निश्चित करण्यासाठी 7745856038 , 97647 42080 , 80077 76682 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
www.konkantoday.com