
रोज रोज भूलथापा ऐकून रत्नागिरीकरांचे कान किटले; पाणी योजनेबाबत सामंत सेनेकडून रत्नागिरीच्या जनतेचा विश्वासघात : बाळ माने
रत्नागिरी शहराची सुधारित नळपाणी योजना यावर्षी पूर्ण होणार, पुढच्या वर्षी पूर्ण होणार असे सांगून रत्नागिरी नगर परिषदेतील सत्ताधारी सामंतसेना आणि उच्च तंत्र शिक्षणमंत्री यांचे तोंड दुखले नसले तरी या भूलथापा रोज रोज ऐकून रत्नागिरी करांचे कान मात्र किटले आहेत. स्थानिक मंत्री आणि नगर परिषदेतील कारभारी नळपाणी योजनेबद्दल अजून किती काळ रत्नागिरीकर जनतेची फसवणूक करणार आहेत. थांबवा आता हा खोटारडेपणा आणि योजना पूर्ण करून जनतेची पाण्याची तहान भागवा, असा टोला माजी आमदार बाळ माने यांनी लगावला आहे.
२०१६ मध्ये मंजूर झालेली सुधारित नळपाणी योजना पाच वर्षांचा काळ उलटला तरी पूर्ण झालेली नाही. मुळातच रत्नागिरी नगर परिषदेवर भाजपचे नगराध्यक्ष असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी आणि नगराध्यक्ष यांनी भेटून ही योजना मंजूर करून घेतली होती. आता योजना पूर्ण होण्यात विरोधकांनी अडथळा आणल्याचे सांगून आपल्या अपयशावर स्थानिक मंत्री आणि सामंतसेनेला पांघरुण घालता येणार नाही. आता तर योजनेचे काम पाहता आणखी किती वर्षे योजना पूर्ण होण्यास लागतील याची कोणतीही खात्री देता येणार नाही, अशी स्थिती असल्याचे बाळ माने म्हणाले. ज्या विश्वासाने रत्नागिरीकरानी सामंतसेनेच्या हाती सत्ता सोपवली होती त्या जनतेच्या विश्वासाचा सामंतसेनेने गळाच घोटला आहे, असा घणाघाती आरोपही बाळ माने यांनी केला आहे.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या स्थितीबाबत बोलताना बाळ माने म्हणाले, गेल्या तीन दशकांच्या काळात यंदाच्या वर्षी एवढी रस्त्यांची दुर्दशा कधीही झाली नव्हती. रस्त्यावरून गाडी चालविणे दूरच..पादचाऱ्याला रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे. सत्ताधारी सामंतसेना केवळ आपले भले करण्याच्या कामात दंग असून त्यांना जनतेच्या समस्यांचे काहीच देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पहिल्याच दणक्यात रस्ते होत्याचे नव्हते झाले आहेत. मंत्री यांचेच, रस्त्यांची कामे करणारे कंत्राटदार ही यांचेच असताना रस्त्यांची दुर्दशा का होते? पाईप लाईन, केबल टाकण्यासाठी रस्ते खणले असतील तर त्याची योग्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी मंत्री आणि नगर परिषदेतील सत्ताधारी सामंतसेनेची नाही काय, असा सवालही बाळ माने यांनी केला आहे.
निवडणुकीसाठी रस्त्याचे राजकारण?
रत्नागिरी नगर परिषदेचा कार्यकाळ येत्या वर्ष अखेरीस संपणार आहे. आता रस्ते केले तर पावसात खराब होतील. निवडणुकीत कोणते काम दाखवायचे असा प्रश्न सामंतसेनेला पडलेला असावां. शहरात गेल्या पाच वर्षात ठळक अशी विकासाची कोणतीच कामे झालेली नाहीत. त्यामुळेच पावसाळ्यानंतर निवडणुकीच्या आधी रस्त्यांची कामे करून मते मागायचे शिवसेनेचे राजकारण आहे, असा आरोप बाळ माने यांनी केला.
ते म्हणाले निवडणुकीच्या आधी काही कामे करून मते मागायची आणि निवडून यायचे आणि पुढील निवडणुकीपर्यंत काहीच करायचे नाही, हे सामंतसेनेचे राजकारण आता रत्नागिरीकर जनतेला चांगलेच कळले असून येत्या निवडणुकीत जनता सामंत सेनेला पराभूत करून नक्कीच धडा शिकवेल, असा विश्वास बाळ माने यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com