मोठी बातमी : आतड्याच्या कर्करोगावर प्रभावी औषधाचा शोध! २१ दिवस उंदरावर…

नागपूर : जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आतड्याचा कर्करोग (कोलोरेक्टल किंवा कोलोन कॅन्सर) या आजारावर यशस्वी निदान करण्याचे संशोधन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व‎ प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) संशोधक डॉ. सविता श्रीकांत देवकर यांनी केले. यासाठी औषधाच्या डिझाईन केलेल्या नॅनो पार्टीकल्सद्वारे कोलन कॅन्सर आजारावर प्रभावी ओरल टार्गेटेड कॅप्सूल औषध तयार करण्यात आले.जगभरात कर्करोग वेगाने पाय पसरत आहे. कर्करोगामुळे दरवर्षी जगात लाखो लोकांचा बळी जात आहे. या आजारावर औषधासाठी अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करीत आहेत. सध्याच्या काळात कर्करोगाचे २०० पेक्षा जास्त प्रकार असल्याने कोणत्याही व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. ‘महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून अर्थसहाय्याचे पाठबळ दिले जाते. निगडी येथील प्रोगेसिव एज्युकेशन सोसायटीच्या मॉर्डन कॉलेज ऑफ फार्मसीमधील प्राध्यापिका डॉ. करीमुन्निसा शेख यांच्या मार्गदर्शनात डॉ. सविता देवकर यांनी आपला प्रबंध ४ वर्षात यशस्वीरित्या पूर्ण केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत डॉ. देवकर यांचा पीएच.डी.चा विषय ‘फॉर्म्युलेशन ॲण्ड इव्हालूशन ऑफ टार्गेटेड ड्रग्स डिलीवरी सिस्टम ऑफ पोटेंशनल ड्रग्स फॉर इट्स एंटी कॅन्सर इफेक्ट’ असा होता. यासाठी औषधाच्या डिझाईन केलेल्या नॅनो पार्टीकल्सद्वारे आतड्यांच्या कर्करोगावर प्रभावी ओरल टार्गेटेड कॅप्सूल औषध तयार केले.*२१ दिवस उंदरावर प्रयोग*पुण्यात राहणाऱ्या डॉ. देवकर यांनी एम. फार्म अभ्यासक्रमानंतर २०२१ मध्ये पीएच.डी. पूर्ण करण्यासाठी महाज्योतीकडून दरमाह ३५ हजार विद्यावेतन मिळवले. चार वर्षात शोध प्रबंध पूर्ण केला. मोठ्या आतड्याचा कर्करोग हा मोठे आतडे किंवा गुदाशयात उद्भवतो. हे सहसा पॉलीप म्हणून दिसून येते. कोलन किंवा गुदाशयाच्या आतील अस्तरावरील पेशींचा एक छोटा समूह कालांतराने कर्करोगात विकसित होऊ लागतो. चार वर्ष प्रामाणिकपणे अभ्यास करून डॉ. देवकर यांनी ‘कोलन कॅन्सर’ आजाराची ओरल टार्गेटेड कॅप्सूल तयार केले. २१ दिवस ते उंदराला दिल्यानंतर ८५ ते ९० टक्के सकारात्मक परिणाम दिसून आले. आता डॉ. देवकर या ओरल टार्गेटेड कॅप्सुलच्या पुढे क्लिनिकल अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करीत आहेत. डॉ. सविता देवकर यांनी महाज्योतीमुळे मिळालेल्या विद्यावेतनाबद्दल आभार मानले आहेत.कर्करोगासारख्या मोठ्या आजारावर संजिवनी देणाऱ्या डॉ. सविता देवकर या महाज्योतीच्या विद्यार्थिनी आहेत, हे अभिमानास्पद आहे. त्यांनी महाज्योतीसह देशाचे नावलौकिक करण्याचे काम केले आहे. महाज्योतीकडून मिळणाऱ्या विद्यावेतनातून राज्यातील हजारो विद्यार्थी प्रगतीपथावर गेले याचा आनंद आहे. *- राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button