१६ कोटी १५ लाखांच्या नवीन ठेवी संकलित करत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या ठेवोत्सवाची सांगता. – ॲड. दीपक पटवर्धन.
२० जून ते २० जुलै हा ‘ठेववृद्धीमास’ म्हणून स्वरूपानंद पतसंस्था गेली २८ वर्ष साजरा करत आली आहे. २० जुलै २०२४ रोजी सांगता झालेल्या ठेववृद्धी मासात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडे रु. १६ कोटी १५ लाखांच्या ठेवी संकलीत झाल्या. १२५५ इतक्या ठेव खात्यांच्या माध्यमातून या ठेवी संकलीत झाल्या. आज अखेरच्या दिवशी रु. १ कोटी १६ लाखाच्या ठेवी संस्थेकडे जमा झाल्या. तर नुतनीकरण झालेल्या अथवा पुनर्गुंतवणूक झालेल्या ठेवी रु. ७४ कोटी असून संस्थेच्या एकूण ठेवी रु. ३२३ कोटी इतक्या झाल्या आहेत. संस्थेच्या ठेववृद्धीमासास यावर्षी बरसणाऱ्या आषाढ घना इतकाच ओतप्रत प्रतिसाद ठेवीदारांनी दिला. ठेवीदारांचा हा सातत्यपूर्ण प्रतिसाद सविनय स्विकारताना मन कृतज्ञतेच्या भावनेने ओतप्रत आहे. प्रचंड स्पर्धा, प्रचंड व्याजदरांची पसरवलेला भुलभुलय्या या कशाचाही विपरीत परिणाम न करून घेता. स्वरूपानंदवर असलेला विश्वास आणि अर्थकारणा पलीकडे जाऊन निर्माण झालेले नाते. स्वरूपानंदाचे अर्थकुटुंब सातत्याने विस्तारित नेत आहे. त्यामुळेच आपलेपणाच्या नात्याने ठेवीदार विश्वासार्हता, सुरक्षितता आणि सदाचारी व्यवहारांचा मानदंड जपणाऱ्या स्वरूपानंद पतसंस्थेकडे मोठ्या विश्वासाने ठेव गुंतवत असतात. त्याचे प्रत्यंतर पुन: पुन: येते. ही विश्वासार्हता जपत संस्थेचे अर्थकारण अधिक व्यापक बनवत अग्रेसर करण्याचा अथक प्रयत्न राहील याची ग्वाही देत ठेववृद्धी मासाच्या या दणदणीत यशाबद्दल आनंद व्यक्त करताना सर्व ठेवीदारांना मनःपूर्वक धन्यवाद देतानाच नवीन आकर्षक योजना घेऊन लवकरच परत भेटू असे सांगतानाच हा प्रतिसाद सुकर व्हावा यासाठी प्रयत्न करणारे स्वरूपानंदचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी या सर्वांचे ही अभिनंदन यांच्या टीमवर्कमुळे ‘ग्राहक देवो भव’ या उक्तीचे आचरण प्रत्यक्षात केल्यानेच संस्था जनमानसात अग्रनामांकन घेऊन पुढे जात आहे अशी भावोत्कट प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.