
मुलाच्या अपहरण प्रकरणी संशयितांची निर्दोष मुक्तता
चिपळूण : सात वर्षापूर्वी चिपळुणातील मुलाच्या अपहरण प्रकरणाचा नुकताच निकाल लागला आहे. न्यायालयाने या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोप वासंती कांबळी व अन्य पाचजणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. माऊली म्हणून संबोधल्या जाणार्या वासंती कांबळी व त्यांच्या सहकार्यांनी तब्बल सात वर्षे या प्रकरणी न्यायालयीन लढा दिला. तालुक्यातील कापसाळ फणसवाडी हे वासंती कांबळी यांचे सासर. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने त्यांनी बरीच वर्षे लोकांच्या घरी धुणी भांडी केली. यादरम्यान त्या बेळगाव निवासी कलावती आई यांची नित्यनियमाने आराधना करू लागल्या. मंदिरात जाणे शक्य नसल्याने त्यांनी घरीच कलावती आईची साधना करण्यास सुरुवात केली.
हुमणेवाडी येथील प्रकाश बाईत याने आपला सात वर्षाचा मुलगा प्रथम याचे अपहरण झाल्याची तक्रार 2015 मध्ये चिपळूण पोलिस स्थानकात दिली. प्रकाश हा हरी मंदिरातील सेवेकरी होता. त्याने केलेल्या तक्रारीमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. मुलाच्या अपहरणामागे वासंती कांबळी यांचा हात असल्याची तक्रार होती. तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी वासंती कांबळी यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली. जादूटोणा विरोधी कायद्याखाली सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. आठवड्याभरात संशयितांची जामिनावर सुटका झालयानंतर चिपळूण न्यायालयात सुनावणी सुरू झाली.
संशयितांच्या बाजूने अॅड. केळकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. अखेर सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने वासंती कांबळी व अन्यजणांची निर्दोष मुक्तता केली.