
“ज्येष्ठ नागरिकांची रहदारीतील सुरक्षा” वर मसुरकर यांचे कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघात २७ रोजी मार्गदर्शन
रत्नागिरी दि. २० (प्रतिनिधी) : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा शनिवार दिनांक 27 जुलै रोजी येथील ज्येष्ठ नागरिक भवनात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संपन्न होणार आहे. यावेळी “मोटार जगत” चे संपादक आणि वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक श्री. राजेंद्र प्रसाद मसुरकर हे “ज्येष्ठ नागरिकांची रहदारीतील सुरक्षा” या विषयावर पॉवर पॉइंटद्वारे प्रेझेंटेशन करणार आहेत.रहदारीतील सुरक्षा हा विषय ज्येष्ठांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. ज्येष्ठ नागरिक मॉर्निंग वॉकला जातात. बागेत फिरायला जातात. बाजारात खरेदीला जातात. आपल्या नातवंडांना शाळेत सोडायला जातात. अशाप्रसंगी त्यांना रहादारीतील अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कशी सावधानता बाळगावी आणि रहदारी सुरक्षेचे नियम कसे पाळावेत, याविषयी श्री. मसुरकर मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. विविध प्रकारचे वाहन चालक आणि वाहनांचा वापर करणाऱ्यांचे सुरक्षित वाहतुकीबाबत प्रबोधन करण्याचा त्यांचा हा ३२ वा कार्यक्रम असेल. या स्नेह मेळाव्यात जुलै महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार ही केले जाणार आहेत. तरी ज्येष्ठ नागरिकांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी केले आहे.