मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना थांबणार नाही -पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी, दि. 18 (जिमाका) : ज्या पध्दतीने संविधान बदलणार अशी अफवा पसरविण्यात आली, तसेच आता या योजनेबाबतही केवळ ही योजना निवडणुकीपुरती आहे, असे काहीजण जाणीवपूर्वक सांगून ही योजना बदनाम करत आहेत. परंतु, ही योजना अजिबात थांबणार नाही, उलट या योजनेच्या रकमेत कदाचित वाढच केली जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
राजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिंधुरत्नचे विशेष निमंत्रित किरण सामंत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, हे शासन कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आहे. त्यासाठीच शुभमंगल योजना, लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, वयोश्री योजना प्रत्येकासाठी लागू केल्या आहेत. या योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपणही पुढाकार घ्यावा आणि या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच अन्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा. शासन सकारात्मक आहे. महिला भगिनिंना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील 2643 सीआरपींना नियोजन मंडळातून मोबाईल वाटप करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सर्वसामान्य मुले अमेरिकेतील नासा येथे जात आहेत. ही माझ्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. राजापूरच्या रस्त्यांसाठी 25 कोटींची कामे सुरु केली आहेत. लवकरच जनता दरबार घेणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. प्रांताधिकारी वैशाली माने यांनी स्वागत करुन प्रास्ताविकामध्ये या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी विविध महिला लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्ज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तहसिलदार शीतल जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.000