
सिडकोने वाशी सेक्टर येथील सुमारे आठ हजार चौरस मीटर भूखंडावरील प्रस्तावित महाराष्ट्र भवनच्या उभारणीसाठी १२१ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागविल्या
_मागील पंधरा वर्षांपासून कागदावरच सीमित राहिलेला महाराष्ट्र भवनचा प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर सिडकोने या प्रकल्पाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करून वाशी सेक्टर ३० ए येथील सुमारे आठ हजार चौरस मीटर भूखंडावरील प्रस्तावित महाराष्ट्र भवनच्या उभारणीसाठी १२१ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागविल्या आहेत.त्यामुळे महाराष्ट्र भवनच्या निर्मित्तीसाठी विविध स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे.सिडकोने विविध राज्यांच्या भवनसाठी वाशी परिसरात भूखंड दिले आहेत. विशेष म्हणजे त्यावर संबंधित राज्यांनी दिमाखात वास्तू उभारल्या आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्र भवनसुद्धा उभारले जावे, अशी मागणी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राजकीय मंडळीकडून केली जात होती. त्यानुसार सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाजवळ सुमारे दोन एकचा भूखंड महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित ठेवला होता. मात्र, मागील अनेक वर्षांपासून तो पडूनच असल्याने बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. आता निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त भवन पुढील दोन वर्षांत बांधून पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांनी व्यक्त केला आहे.