
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकित कर्जदारास ५ हजारांचा दंड
बेलेबल वॉरंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येथील शाखेचे थकित कर्जदार जीवन चंद्रसिंग कोकणी यांना येथील न्यायालयाने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करत कर्ज रक्कम भरण्याचे आदेशही दिला आहे. बँकेच्या पॅनलवरील ऍड. संदेश वंदना गणपत चिकणे यांनी बँकेच्यावतीने काम पाहिले.जीवन कोकणी यांनी बँकेकडून २०१८ मध्ये ८ लाख ८५ हजार रुपयांचे पगार कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड त्यांनी नियमित न केल्याने बँकेने वसुलीसाठी सतत पाठपुरावा केला होता. त्यापोटी २०२१ मध्ये कर्ज वसुलीसाठी बँकेस धनादेशही दिला होता. मात्र खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश न वटताच परत आला होता. या प्रकरणी बँकेने चेक अनादरप्रकरणी येथील न्यायालयात तक्रार दाखल केली होती. कर्जदार कोकणी हे बँकेने दिलेल्या कोणत्याही नोटीस घरी असूनही स्वीकारत नव्हते. तसेच २०२१ पासून दाखल तक्रारीबाबत पकड वॉरंट बजावणी करण्यासही ते टाळाटाळ करत होते. अखेर या प्रकरणी पोलिसांनी तपास करून कोकणींना अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता बेलेबल वॉरंटचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५ हजार रुपये दंड ठोठावला तसेच १५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका केली. www.konkantoday.com