काश्मीरमध्ये पाच जवान शहीद! विरोधकांकडून निषेध आणि टीका!!

जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सोमवारी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले तर अन्य पाच जवान जखमी झाले. हे जवान मचेडी या दुर्गम भागात वाहनातून नियमित गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला केला आणि गोळीबार केला. कथुआपासून १५० किलोमीटर अंतरावर बडनोटा गावाजवळील मचेडी-किंडली-मल्हार रस्त्यावर दुपारी साडेतीनच्या सुमाराला ही घटना घडली.अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यात एकूण १० जवान जखमी झाले आणि त्यावेळी चौघे शहीद झाले. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी एका जवान शहीद झाला. जवानांनी या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, पण दहशतवादी जवळपासच्या जंगलामध्ये पळून गेले. त्या भागात सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात चकमक अजूनही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या जवानांच्या मदतीसाठी अन्य सैनिक पाठवण्यात आले आहेत. हे घनदाट जंगल उधमपूर जिल्ह्यातील बसंतगढशी जोडलेले आहे, त्या भागात पूर्वी अनेक चकमकी झाल्या आहेत. सोमवारच्या घटनेमध्ये तीन शस्त्रसज्ज दहशतवादी सहभागी असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी अलिकडेच सीमेपलिकडून घुसखोरी केल्याचा अंदाज आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध करतानाच केंद्र सरकारवर टीका केली आहे. कठोर कृती हे सातत्यपूर्ण दहशतवादी हल्ल्यांना उत्तर आहे, पोकळ भाषणे नाहीत असे राहुल यांनी ‘एक्स’वर लिहिले. तर, ”कितीही प्रमाणात रंगसफेदी, खोटे दावे, पोकळ बढाया आणि छाती बडवण्याचे प्रकार केले तरी, मोदी सरकार जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षेच्या बाबतीत संकटकारक आहे हे तथ्य खोडून काढता येणार नाही,” अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती आणि गुलाम नबी आझाद यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. कर्तव्य बजावत असलेल्या शूर सैनिक शहीद होणे हे फार वाईट आहे असे अब्दुल्ला यांनी ‘एक्स’वर लिहिले. तर, ज्या भागात २०१९पूर्वी क्वचितच दहशतवादी कारवाया होत असत तिथे अशा घटना घडत असल्याबद्दल मुफ्ती यांनी चिंता व्यक्त केली. दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी सरकारने निर्णायकपणे कृती केली पाहिजे अशी मागणी आझाद यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button