जयंत पाटील यांचा गैरसमज रत्नागिरीतील काेणत्या महनीय व्यक्तीने करुन दिला याचा मला शाेध घ्यावा लागेल- पालकमंत्री उदय सामंत
जयंत पाटील यांनी विधानसभेत बाेलताना त्या कंपनीचे संचालक काेण आहेत, त्यांचे वय काय आहे हे पाहायला हवे होते. त्यांनी प्रश्न उपस्थित केला म्हणून माझ्या मनात आकस नाही. मात्र, त्यांनी आधी माहिती घ्यायला हवी हाेती.ते माहिती घेऊन बाेलले असते तर आनंद वाटला असता, असा टाेला राज्याचे उद्याेगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लगावला.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शनने डांबर घाेटाळा केल्याचे सांगून चाैकशीची मागणी केली आहे. याबाबत मंत्री सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बाेलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, जयंत पाटील यांनी ज्या कंपनीचा उल्लेख केला आहे, त्या आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शनचे संचालक माझे वडील आहेत. त्याचे वय आता ८० वर्षे आहे. दुसरी संचालक माझी आई असून, तिचे वय ७९ आहे. जयंत पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने चुकीच्या माहितीद्वारे सभागृहात अशा बुजुर्ग मंडळींचा अपमान करणे ही फार शाेकांतिका आहे.जयंत पाटील यांनी जर मला याबाबत विचारले असते तर मी त्यांना माहिती दिली असती. चुकीची कागदपत्र दाखवून ज्या माणसांनी त्यांचा गैरसमज केलेला आहे. ताे गैरसमज लवकरच दूर हाेईल.माझ्या वडिलांनी या जिल्ह्यात शेकडाे ठेकेदार तयार केले आहेत. त्यामुळे ८० टक्के काम त्या कंपनीकडे असण्याचा प्रश्नच येत नाही, असे मंत्री सामंत म्हणाले. जयंत पाटील हे रत्नागिरीचे जावई आहेत, त्यामुळे त्यांचा गैरसमज रत्नागिरीतील काेणत्या महनीय व्यक्तीने करुन दिला याचा मला शाेध घ्यावा लागेल. मात्र, ते माहिती घेऊन बाेलले असते तर आनंद झाला असता, असेही सामंत म्हणाले.