दापोली तालुक्यातील पालगड येथे नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू
दापोली प्रतिनिधी – तालुक्यातील पालगड येथील कोंडी नदीच्या पात्रात तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. युवराज यशवंत कोळुगडे (३६) असे मृत तरुणाचे नाव आहे.युवराज हा आई व मोठ्या भावासह पालगड-संभाजीनगर येथे रहात होता. तो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करीत असे. ४ जुलै रोजी सकाळी तो घरामधून बाहेर पडला, तो परत घरी आला नाही. यामुळे त्याची सर्वत्र शोधाशोध सुरू होती. अखेर शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह कोंडी नदीपात्रात तरंगत असलेला आढळून आला. या बाबत पालगडचे पोलीस पाटील रुपेश बेलोसे यांना दूरध्वनीवरून कळविण्यात आल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन संबंधित माहिती दापोली पोलीस स्थानकाला कळवली. दापोली पोलीस स्थानकाचे प्रसाद मोरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अंकुश बामणे, संदीप इंदुलकर व सुनील मोरे यांनी मदत केली. यानंतर मृतदेह दापोली उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला.