रत्नागिरी शहरातील विविध प्रश्न घेऊन भाजप कार्यकर्ते धडकले नगरपरिषद कार्यालयावर..
*रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील विविध प्रश्न लक्षात घेता भारतीय जनता पार्टी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांच्यासह शहराध्यक्ष राजेंद्र फाळके व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्यअधिकारी यांची भेट घेतली व रत्नागिरी शहरातील प्रमुख प्रश्नांचा पाढाच वाचला. संपूर्ण रत्नागिरी शहरामध्ये खड्डे बुजविण्यासाठी जांभा खडकाचा वापर केला जात आहे त्याऐवजी पावसाळी डांबर वापरून खड्डे भरा. गॅस पाईपलाईनचे खोदकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक होते तरीदेखील पावसाळा सुरू होऊन देखील अनेक ठिकाणी गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे ते ताबडतोब थांबवा, रत्नागिरी शहरामध्ये एकाच वेळी सर्व शहरात डास प्रतिबंधक फवारणी करा, ठिकठिकाणी साठलेले कचऱ्याचे ढीग पाहता त्याचे योग्य नियोजन करून कचरा उचलला त्यासाठी लागणारी वाहने उपलब्ध करा, उनाड गुरांचा बंदोबस्त आणि भटकी कुत्रे यांचे देखील प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यावर देखील उपाय योजना करणे आवश्यक आहे. स्वच्छतेसाठी शाळा, महाविद्यालय, दवाखाने आदी परिसरामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करा. नागरिकांचे प्रश्न जो मांडेल तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा नाही याकडे न पाहता सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जो कोणी कार्यकर्ता येऊन मांडेल ते सोडवले गेले पाहिजेत असे देखील राजेश सावंत यांनी आवर्जून सांगितले. शहरातील विविध प्रश्नांवरती उपाय योजना तातडीने झाल्या पाहिजेत. यासाठी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. तसेच शासनाने सुरू केलेल्या नवीन योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांना दाखले लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी प्रभागानुसार नियोजन करून नागरिकांना दाखले उपलब्ध करून द्या अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. मुख्याधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत या सर्व प्रश्नांकडे गांभीर्याने पाहत नियोजन केले जाईल असा शब्द यावेळी उपस्थित भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना दिला.